मुंबई : राजधानी मुंबईतील मुस्लीमबहुल वर्सोवा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून वर्सोवा विधानसभेची जागा काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पुर्णविराम देत शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपविभाग प्रमुख हारून खान यांची उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. हारून खान यांची निवड झाल्यामुळे वर्सोवा (Mumbai) विधानसभेत मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या उमेदवारपदाची घोषणा होताच, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज झाले असून त्यांनी बंडखोरीची भाषा करत अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचेही जाहीर केले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून मुंबईसाठी 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आजच शिवसेनेकडून मुंबईतील 3 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये हारुन खान यांना संधी देण्यात आली आहे. हारुन खान यांच्या रुपाने शिवसेनेकडून ठाकरेंनी पहिला मुस्लीम चेहरा विधानसभेच्या रणांगणात उतरला आहे.
लोकसभा निवडणुकीला मुस्लीम समाजाची मोठी मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचा दावा केला जातोय. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेमुळे अनेक जागांवर काँग्रेसचा फायदा झाल्याचंही राजकीय विश्लेषण केलं जातंय. त्यातच, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन नेहमीच शिवसेना ठाकरे आणि भाजपात खडाजंगी झाल्याचं दिसून येतं. त्यातच, महाराष्ट्रातून शिवसेना ठाकरे पक्षाचा पहिला मुस्लीम चेहरा हारुन खान यांच्या रुपाने देण्यात आला आहे. हारुन खान हे गेल्या 15 वर्षांपासून शिवसेना शाखा 64 चे शाखाप्रमुख आहेत. तर, त्यांच्या पत्नी नगरसेवक राहिल्या आहेत, कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणूनही त्यांची जोगेश्वरी येथे ओळख आहे. आता, ठाकरेंनी त्यांना थेट विधानसभेचं तिकीट देत राज्यातील पहिला मुस्लीम उमेदवार दिला आहे. कारण, शिवसेना युबीटी पक्षाकडून जाहीर झालेल्या 83 मतदारसंघातून हेच पहिले मुस्लीम उमेदवार आहेत. मात्र, हारुन खान यांच्या उमेदवारीला वर्सोवा मतदारसंघातून विरोध होत आहे.
मुंबईतील शिवसेना शाखा 64 चे शाखाप्रमुख म्हणून हरुन खान यांनी 15 वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, शिवसेनेतील बंडानंतरही ते शिवेसना ठाकरे यांच्यासमवेतच राहिल्याने ठाकरेंकडून यंदाच्या विधानसभेत त्यांना उेमदवारी देण्यात आली आहे. मात्र, हरुन खान यांच्या उमेदवारीनंतर येथील मतदारसंघात इच्छुक असलेले राजू पेडणेकर आणि राजूल पटेल नाराज झाले आहेत. आमच्या पक्षाने आमच्यावर अन्याय केला अशी खंत व्यक्त करत हे दोघेही अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.
राजू पेडणेकर नाराज, अपक्ष लढणार
गेल्या 35 वर्षांची अहोरात्र मेहनत,त्याग, पक्षनिष्ठा, संघटने प्रति समर्पण, केसेस, समाजकार्य या बदल्यात सततचा होणारा अन्याय. 2004,2009,2014,2019 आता 2024 ला. या सर्वाचा न्याय निवाडा माझ्या वर्सोवा विधानसभेतील माझ्या जिवाभावाचे शिवसैनिक, कार्यकर्ते, व सर्व सामान्य जनता नक्कीच करेल ही त्यांच्याकडून अपेक्ष. मी या अन्याय विरुद्ध लढत आहे, तीन दशकांच्या माझ्या राजकीय सामाजिक जीवनाच्या प्रवासात कधीतरी हा छोटासा कार्यकर्ता तुमचा राजू तुम्हाला उपयोगी पडला असेल तर मला नक्की बळ द्या. अन्यायाविरुद्धच्या या लढाईत सामील व्हा,आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा, अशी फेसबुक पोस्ट राजू पेडणेकर यांनी केली आहे.
काँग्रेसही या जागेसाठी इच्छुक
महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या जागेचा तिढा अद्यापही सुटला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरे आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये वर्सोव्याबाबत चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी वर्सोव्यासाठी हरुन खान यांच्या रुपात मुस्लीम चेहरा विधानसभेच्या रिंगणात उतरवलाय. त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आज बाळासाहेब थोरातांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी केलेल्या बैठकीत, जागांची अदलाबदल करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.