मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीवर मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे, त्यामुळे आता राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरती माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील सकारात्मकता दाखवली आहे, या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यावर शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचा एजंट असून उद्धव ठाकरे प्रमाणेच राज ठाकरे यांनाही या दोघांच्या दावणीला नेऊन बांधायचे आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे यांचे राजकारण उध्द्वस्त करण्यासाठी त्यांच्याभोवती मायाजाल टाकत असल्याचा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे. संजय राऊत हा नारदाची अवलाद असून ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं तसे आता राज ठाकरे यांचे राजकारण संपवण्याच्या मागे लागला असल्याचा घणाघात शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणालेत शहाजी बापू पाटील?

मांजरेकरांनी राज ठाकरेंची घेतलेल्या मुलाखतीतून हे एक नवीन वादळ सुरू झालेलं आहे.पंरतू कलयुगातील नारदमुनीची अवलाद आहे, ती म्हणजे संजय राऊत. संजय राऊत हे घडू देणार नाही.संजय राऊत सध्या राज ठाकरेंच्यावर मुलाखतीतून जे मायावी जाळ टाकत आहे, त्यातून राज ठाकरे यांचं राजकारण उध्द्वस्त करण्याचा त्यांचा डाव आहे. राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या कडव्या मुद्यापासून बाजुला सारायचं आणि उध्दव ठाकरेंच्या प्रमाणे राज ठाकरेंना सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या दावनीला बांधायचं, ही स्वप्न संजय राऊतांची आहेत. संजय राऊत हे काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाचा एजंट बनून काम करत असल्याचा हल्लाबोल देखील शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे?

महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे. 

उध्दव ठाकरे काय म्हणाले?

किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.