मुंबई: महायुतीतील वादामुळे अद्याप पालकमंत्रीपदाचा फैसला न झालेल्या रायगड जिल्ह्यातील नियोजन समितीची (Raigad DPDC Meeting) वार्षिक बैठक मंगळवारी मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीला अदिती तटकरे (Aditi Tatkare) वगळता रायगड जिल्ह्यातील अन्य आमदार उपस्थित नसल्याने वाद निर्माण झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात ही ऑनलाईन बैठक झाली. मात्र, या बैठकीला रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार असलेल्या भरत गोगावले, महेंद्र दळवी आमि महेंद्र थोरवे उपस्थित नव्हते. आम्हाला या बैठकीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते, असा दावा महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी केला. यावरुन वादंग निर्माण होताच अजित पवार यांच्या कार्यालयाकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 


नाशिक आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून आम्ही केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले होते. रायगडचे मंत्री म्हणून आदिती तटकरे आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भरत गोगावले या बैठकीसाठी आले नाहीत. तर नाशिकच्या वार्षिक जिल्हा नियोजन बैठकीसाठी दुपारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाभुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाच्या विरोधामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळाला नव्हता. परंतु, आता अजित पवार यांनी अदिती तटकरे यांना सोबत घेऊन रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्याने महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे. 


 रायगड जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीला अजित पवार, अदिती तटकरे आणि शासकीय अधिकारी उपस्थित असल्याची माहिती मला कळाली. अजित पवार यांच्या दालनात ही बैठक झाली. रायगड जिल्ह्याच्या विकासाबाबत या बैठकीत चर्चा झाली. मात्र, आम्ही सर्व आमदार रायगडमध्ये असून आम्हाला बैठकीचे निमंत्रण नव्हते. आजची बैठक अधिकृत होती तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलवायला पाहिजे होते. आम्हाला बैठकीची ऑनलाईन लिंकही पाठवण्यात आली नाही. पण आम्हाला बैठकीची कोणतीही माहिती देण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली. 



आणखी वाचा


इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?