मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यात महाविकास आघाडी व महायुती यांच्यातील जागावाटपावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे, विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून उशीर होत आहे. त्यात, भाजपने आघाडी घेतली असून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर, आजच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas aghadi) एकही यादी अद्याप जाहीर झाली असून शिवसेना-काँग्रेसमध्ये काही जागांवरुन जागावाटप अडून बसल्याचं समजतं. मात्र, शरद पवारांच्या (Sharad pawar) मध्यस्थीने अखेर काँग्रेस-शिवसेनेत हातमिळवणी झाली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीच जागावाटपाचं गणित ठरलंय. त्यानुसार उद्या महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित होणार असून लवकरच पहिली यादी जाहीर होईल. 


महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विदर्भातील जागांवरुन मतभेद होते. विदर्भातील काही जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा केला जात होता, तर काँग्रेसही या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे, दोन्ही पक्षातील वाद चिघळल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता दोन्ही पक्षांतील जागावाटपावर दिल्लीतून मार्ग निघाला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मध्यस्थी करत विदर्भातील वाटपाचा तिढा सोडवला असून आजच्या आज महाविकास आघाडीचे नेते हा विषय संपुष्टात आणणार आहेत. विशेष म्हणजे आज-उद्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. 


महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील वादावर  शरद पवार यांनी मध्यस्थी केली. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याने जास्त वेळ न घेता तातडीने जागा वाटपाचे सूत्र ठरवून  महाविकास आघाडीचे पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वादात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मध्यस्थी केली असून जयंत पाटील यांनी मातोश्रीवर भेट दिली आहे. 


शरद पवारांची दोन्ही पक्षांशी संवाद


महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे वादावर शरद पवारांनी मध्यस्थी केली. त्यासाठी, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन जागावाटपातील काँग्रेसच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस हायकमांडशी बोलून या वादावर मध्यस्थी केल्याची माहिती आहे. तर, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील शरद पवारांना ठाकरे गटाच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर शरद पवारांचा निरोप घेऊन जयंत पाटील मातोश्रीवर गेले होते. शरद पवार आणि काँग्रेसमध्ये झालेल्या बैठकीची माहिती त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली. त्यामुळे कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अडचण निर्माण न करता तातडीने हा गुंता सोडवण्याचा विचार महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. 


हेही वाचा


ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण