Shinde Vs Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे 9 ऑक्टोबर रोजी ही सभा घेणार आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथे संध्याकाळी जाहीर सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे. महाप्रबोधन यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे राज्यातील प्रमूख शहरात जाहीर सभा घेणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनेच होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात जो झंझावात निर्माण होणार आहे, तो कायम राहावा आणि राज्यभरात तो झंझावात पोहोचवता यावा, यासाठी शिवसेनेने हे पुढील नियोजन केले असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच उद्धव ठाकरे हे 9 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील टेंभी नाक्यावर जाहीर सभा घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. या सभेपासूनच शिवसनेच्या महाप्रबोधन यात्रेला देखील सुरुवात होणार आहे. या महाप्रबोधन यात्रेदरम्यान जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन उद्धव ठाकरे हे शिवसनेचा प्रचार-प्रसार करण्याचं काम करणार आहेत, असं बोललं जात आहे. यासोबतच खरी शिवसेना कोणाची हा थेट संदेश आणि विचार पोहोचवण्याचं काम देखील ते करणार असल्याचं बोललं जात आहे.
या महाप्रबोधन यात्रेच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये भाषणं देखील करणार आहेत. यातच प्रामुख्याने पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर अशा प्रमुख शहरांमध्ये ते भाषण करू शकतात. तसेच या यात्रेची सांगता ही कोल्हापुरातील बिंदू चौकात जाहीर सभेने होणार आहे. यातच यात्रेदरम्यान मध्ये-मध्ये आदीत्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं राज्यातील जनतेला पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यातच ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथील मैदानावर होणार आहे. या मेळ्याव्यासाठी दोन्ही गट सज्ज झाले असून दोघांचीही जोरदार तयारी सुरू आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतील, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच आपल्या मेळाव्यात सर्वात जास्ती गर्दी जमावी म्हणून दोन्ही गटाचे कायकर्ते आणि नेते गर्दी जमवण्यासाठी आतापासूनच कामाला लागले आहेत.