Shiv Sena BJP Alliance : राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची काल (4 जून) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीचं फलित झाल्याचं ट्वीट केलं आहे. राज्याच्या विकासासाठी आमची युती 11 महिन्यांपासून काम करत आहे. पुढच्या काळात सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी, विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवणार आणि बहुमताने जिंकणार, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.
निवडणुका एकत्रित लढवणार आणि जिंकणार : मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरु असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या 11 महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार."
निवडणुकाच नाही तर त्यासाठी रणनीतीही एकत्रित तयार करणार : देवेंद्र फडणवीस
तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचे ठरवल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली आहे. दोन्ही पक्ष फक्त निवडणुकाच एकत्रितपणे लढणार नाही तर त्यासाठी एकत्रित रणनीतीही तयार केली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षात जिल्हा स्तरापासून तालुका स्तरापर्यंत समन्वय घडवले जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार होईलच, मात्र मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल हे मुख्यमंत्री ठरवतील असे ही फडणवीस म्हणाले. नाना पटोले ज्या पक्षाचे प्रतिनिधी करतात त्या पक्षात प्रातःविधीसाठीही हायकमांडची दिल्लीहून परवानगी घ्यावी लागते. आम्ही तर राष्ट्रीय पक्ष आहोत. त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो तर काय वाईट आहे, असा प्रश्न विचारुन फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिलं.
'औरंगजेबाचे फोटो दाखवत असे तर मान्य करणार नाही'
दरम्यान, अहमदनगरमध्ये काही समाजकंटकांनी औरंगजेबाचे फोटो दाखवल्याच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. औरंगजेबाचे फोटो जर कोणी दाखवत असेल तर हे मान्य केले जाणार नाही. या देशांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू शकतात, कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी माफी नाही असे फडणवीस म्हणाले.
VIDEO : Eknath Shinde : शिवसेना भाजप महायुती पूर्ण ताकदीने येणाऱ्या निवडणुका लढणार आणि जिंकणार
हेही वाचा