Shirur Lok Sabha Election 2024 : मंचर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) मंगळवारी मतदान पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, तसेच, मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांच्यासोबत काटेवाडीतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. श्रीनिवास पवारांनी आरोप केल्यापासूनच अजित पवारांच्या निर्णयावर त्यांच्या मातोश्री नाराज असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. अशातच अजित पवारांनी आईसोबत मतदान केंद्र गाठल्यानं श्रीनिवास पवारांना अजित पवारांनी उत्तर दिल्याचं बोललं जात होतं. अशातच आईसोबत मतदान केल्यामुळे सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील चर्चांबाबत खंत व्यक्त केली. आज शिरुरमधील सभेत बोलताना माझ्या आईसोबत मतदानाला गेलो, तुमच्या का पोटात दुखलं? असा थेट सवाल अजित पवारांनी विचारला आहे. 


मी आई सोबत मतदानाला गेलो, तरी हे राजकारण करतात; अजित पवारांची खंत


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बोलताना म्हणाले की, "बारामतीत मी आईसोबत मतदानाला गेलो. आता मी ज्या आईच्या पोटी जन्माला आलो, तिला सोबत घेऊनच मतदानाला जाणार ना? बरं पहिल्यांदाच गेलो असं आहे का? प्रत्येक मतदानाला आई माझ्यासोबत मतदानाला येते. यांच्या पोटात आत्ताच का दुखलं? काय म्हणाले तर, दादा राजकारण करतायेत. आता यात कसलं राजकारण आलं. आईनं मला सांगितलं, आपण दोघांनी सोबतच जायचं, म्हणून प्रत्येकवेळी प्रमाणे आम्ही एकत्र जाऊन मतदान केलं." 


नेमकं घडलेलं काय? 


बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडलं. यावेळी अजित पवार आणि कुटुंबियांनी काटेवाडीतील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार हे जेव्हा मतदानाला आले तेव्हा त्यांची आई आशाताई अनंतराव पवार या त्यांच्यासोबत होत्या. या दोघांनीही मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अजितदादांनी आपली आई सोबत आल्याचा उल्लेख आवर्जून केला. आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे, याची नोंद सर्वांनी घ्यावी, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी हे वक्तव्य करुन एका दगडात दोन पक्षी मारले अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं. एकीकडे माझी आई घराण्यात सर्वात ज्येष्ठ असल्याचं अधोरेखित करुन शरद पवार यांना टोला लगावला असल्याचं बोललं जात होतं. तर दुसरीकडे माझी आई मतदानाला माझ्यासोबत आल्याचं सांगत ती माझ्याच बाजूनं असल्याचा संदेशही अजितदादांनी आरोप करणाऱ्या श्रीनिवास पवारांना दिल्याचं बोललं जात होतं. 


आढळरावांच्या प्रचार सभेत अजित पवारांचा संताप 


शिरुर लोकसभा मतदारसंघात आज महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांसाठी अजित पवारांच्या मॅरेथॉन सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच अजित पवार पहिल्या सभेसाठी मंचरमध्ये दाखल झाले, पण त्यांच्यापूर्वी इतर नेत्यांची भाषणं सुरू होती. त्यामुळे अजित पवार संतापले. अजित पवार भाषणाला उभे राहिल्यानंतर म्हणाले की, "या पक्षाला बोलू द्या, त्या पक्षाला बोलू द्या. महायुती असल्यानं हे बऱ्याच ठिकाणी घडतंय. पण जरा वेळेचं भान ठेवा, प्रचाराला वेळ कमी आहे. त्यामुळं मी जिथं सभेला जातो तिथं उमेदवार आणि मग मी बोलतो. मगाशी एक-एक जण भाषणाला उभं राहायला लागले. महायुती असल्यानं असं घडतंय. पण अरे बाबांनो जरा वेळ बघा." 


पाहा व्हिडीओ : Ajit Pawar Full Speech : चुना लावू का? तुमच्या पोटात का दुखतं?बारामतीचं मतदान संपताच दादा खुलले!