Amol Kolhe vs Shivajirao Adhalrao : शिरुर : शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे (Amol Kolhe) विरुद्ध शिवाजी आढळराव (Shivajirao Adhalrao) यांच्यात आव्हान-प्रतिआव्हानाची लढाई सुरू आहे. अशातच आज अजित पवार (Ajit Pawar) मॅरेथॉन सभा घेणार आहेत. याच प्रसंगी कोल्हेना दुसऱ्यांदा खासदार होऊ देणार नाही, असं आव्हान अजित पवारांनी दिलं आहे. अशातच अजित पवारांचं आव्हान स्विकारणाऱ्या अमोल कोल्हेंनी आता दादांना प्रतिआव्हान दिलं आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नेता हवा की अभिनेता, असं म्हणणाऱ्यांनी आज उत्तर द्यावं, असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलं आहे. कोल्हेंच्या या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
काही दिवसांपूर्वी आढरावांनी संसदेत शिरुरच्या जनतेचे प्रश्न न विचारल्याचा आरोप कोल्हेंनी केला होता. त्यावर पुरावे द्या, मी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतो, असं आव्हानही कोल्हेंना आढळरावांनी दिलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडण्याचं शब्द पाळणार का? याची आठवण कोल्हेंनी आढळरावांना आजच्या सभांप्रसंगी करून दिली आहे. यासाठी आढळरावांच्या डायनालॉग कंपनीला आणखी एक पुरावा त्यांनी व्हिडीओमध्ये सादर केला आहे. 29 एप्रिल 2016रोजी आढळरावांनी विचारलेल्या प्रश्नाचा मुद्दा आता कोल्हेनी छेडलाय. हा प्रश्न ही संरक्षण विभागाशी संबंधित असल्याचा आणि यातून आढळरावांनी स्वतःच्या कंपनीचं हित साधल्याचा दावा कोल्हेनी केलाय. पहिल्या पुराव्याचा आणि माझ्या कंपनीचा संबंध नाही असं आढळराव म्हणाले होते. त्यानंतर कोल्हेनी दुसरा पुरावा दिलाय, आता आढळरावांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याचं शब्द पाळावा. असं कोल्हेनी आवाहन केलंय. सोबतच "नेता हवा की अभिनेता" हा प्रश्न विचारणाऱ्यांना याची कल्पना आहे का? असेल तर त्यांनी 'उद्योगपती हवा की सर्व सामान्यांचे प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी हवा' याचं उत्तर द्यावं. असं आव्हान कोल्हेनी अजित दादांना दिलंय. अजित पवार आज दिवसभर आढळरावांसाठी सभा घेणारेत, यावेळी कोल्हेच्या आव्हानाला प्रतिउत्तर दिलं जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
आढळराव शब्दाला पक्के असतील तर... : अमोल कोल्हे
अमोल कोल्हेंनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, "शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी मला आव्हान दिलेलं की, शिरुरमधील जनतेनं 2004, 2009 आणि 2014 अशा तीन टर्म आढळरावांना पाठवल्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न हे संरक्षण खात्याविषयक, रेल्वेविषयक विचारले गेले, यातलं नेमकं रहस्य काय? असा प्रश्न मी विचारला होता. त्यांनी आव्हान दिलं होतं की, यातला पुरावा दाखवा की, यातून कंपनीचं भलं होतंय आणि पुरावा दिल्यानंतर ते निवडणुकीतून माघार घेतील. ते शब्दाला पक्के असतील तर माझ्याकडे अनेक पुरावे आहेत."
"मराठी माणसानं उद्योग उभा करणं ही अभिमानाचीच गोष्ट आहे. पण मायबाप जनतेनं आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर त्या पदाचा वापर आपण कशासाठी करतो, यामध्ये हेतूशुद्धता समोर येते आणि हा हेतू मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्या पदाचा वापर झाला तर, ते फायद्याचं ठरतं. माझी खासदारांची Dynalog India नावाची कंपनी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, या कंपनीच्या वेबसाईटवर जा. तिथे वेगवेगळे टॅब येतील आणि तिथे डिफेन्स या टॅबवर तुम्हाला ही कंपनी संरक्षण खात्याला काय-काय सुविधा पुरवते हा सर्व तपशील येतो. त्यानंतर 29 एप्रिल 2016 मध्ये माजी खासदार आढळरावांनी कंपनीचे मालक म्हणून संसदेला प्रश्न विचारलेला की, सरकारनं डिफेन्सच्या खरेदीचं धोरण तयार केलेलं आहे का? या प्रश्नाचा शिरुर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या प्रश्नांशी काय संबंध आहे? हे खरतरं आढळरावांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे.", असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
...म्हणून आढळरावांच्या तिनही टर्ममध्ये शिरुरमध्ये एकही प्रोजेक्ट आलेला नाही : अमोल कोल्हे
"आढळरावांच्या उत्तरावर समोर आलेली माहिती आणखी भयावह आहे. यामध्ये कोणत्या अटींवर देशातील कंपन्यांना डिफेन्स धोरणात समाविष्ठ केलं जाणार याचा तपशील सांगितला आहे. ही माहिती आपल्या पदाचा गैरवापर करुन मिळलेली नाही का? याचंही उत्तर आढळरावांनी देणं गरजेचं आहे. शिरुरमधल्या लोकांनी तब्बल तीन टर्म तुमच्यावर विश्वास ठेवला होता. या तिनही टर्ममध्ये एकही मोठा प्रोजेक्ट शिरुरमध्ये आलेला नाही. याचं कारण शिरुरचे आमदार डिफेन्स धोरणाबाबतचे प्रश्न विचारत होते.", असे सवालही अमोल कोल्हेंनी व्यक्त केले आहेत.
अमोल कोल्हे म्हणाले की, "शिवाजीराव आढळरावांसाठी प्रचार करणाऱ्यांनी प्रश्न विचारला होता की, नेता हवा की अभिनेता? पण साधा सरळ प्रश्न आहे की, नेत्याच्या रुपात स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा उद्योगपती हवा की, सर्वसामान्य जनतेचे किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा लोकप्रतिनिधी हवा? हा खरा प्रश्न आहे." तसेच, आता शिवाजीदादा या प्रश्नाचं उत्तर देणार का? त्यांनी जे आव्हान दिलं होतं, ते स्विकारुन निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार का? आणि जे नेते शिवाजीराव आढळरावांसाठी मतं मागायला येणार? त्यांना या गोष्टीची कल्पना आहे का? असे काही प्रश्नही अमोल कोल्हेंनी यावेळी व्यक्त केले आहेत.