शिर्डी : अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) आजी-माजी खासदारांसमोर युवा महिला उमेदवाराने आव्हान उभ केल्याने ही निवडणूक तिरंगी झाली आहे. महाविकास आघाडी तसेच महायुती आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit) उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला आहे. मात्र या सर्व प्रचारात मुंबईचं पार्सल हा मुद्दा आता लक्षवेधी ठरतोय.


शिर्डीच मुंबईचं पार्सल मुद्दा ठरतोय लक्षवेधी


विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) हे मूळचे मुंबईचे आहेत, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते (Utkarsha Rupwate) यांचा जन्म सुद्धा मुंबईत झाला असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausahab Wakchaure) यांनी या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलंय आणि हे मुंबईचे पार्सल आता पुन्हा मुंबईला पाठवण्याची वेळ आली असल्याची टीका सभेमधून केली आहे. तर याच टीकेला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरेंसह विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा देखील समाचार घेतला आहे.


उमेदवारांचे आरोप-प्रत्यारोप


महाविकास आघाडी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी म्हटलं आहे की, एक पार्सल मुंबईहून आलं आणि उद्धव ठाकरेंमुळे 13 दिवसात खासदार झालं. मात्र, गेल्या दहा वर्षात कोणत्या गावात गेले नाही, कोणाला भेटले नाही आणि निवडणूक आली की फक्त खोटं बोलायचं. जो माणूस दारू पाजतो, जो माणूस डान्सबार चालवतो, त्याच्यात कोणती नैतिकता? त्यामुळे हे पार्सल पुन्हा मुंबईला पाठवायचं. दुसरा एक पार्सल मुंबईहून आलंय, त्यांचा या मातीशी संबंध नाही, मात्र ते वंचितच्या उमेदवार आहेत आणि वंचित ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांना मतदान करू नका, त्यामुळे या निवडणुकीत मशाल पेटवण्यासाठी मला दिल्लीला पाठवा, अशी टीका भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.


तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चुरस


वंचित उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनीही जोरदार टीकास्त्र डागत म्हटलं आहे की, एकाने मला मुंबईचा पार्सल म्हटलं तुम्ही ऐकलं असेल, मात्र ज्यावेळी कोविड काळ होता त्यावेळेस हेच मुंबईच पार्सल संगमनेर अकोले कोपरगाव मध्ये मदत करत होतं. त्यावेळी तुम्ही कुठल्या बीळात लपून बसले होते. महिलांचे प्रश्न उभे राहिले. आंदोलन करण्याची वेळ आली तेव्हा आम्ही सगळे रस्त्यावर होतो. त्यावेळी हे दोघे आजी-माजी कुठे बिळात लपून बसले होते हे त्यांनी सांगावं. पुढील 14 ते 15 दिवसात आपल्याला मतदारापर्यंत पोहोचून नियोजन करत आपलं विजय साध्य करायचाय, अशं रुपवते यांनी म्हटलं आहे.


खासदारकीचा निधी शिल्लक कसा राहिला?


महायुती उमेदवार विद्यमान खासदार लोखंडे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. लोखंडे म्हणाले, समोरचा उमेदवार चार पावलं चाललं तरी थकतो. नुसते सभा मंडप दिले म्हणजे विकास होत नाही. खासदार निधी सोडून एका योजनेतून काम केलं असेल तर ते समोर आणावं. ज्यावेळी ते खासदार होते त्यावेळी त्यांचा दीड कोटींचा निधी शिल्लक राहिला होता. जर काम करणारे खासदार होते तर हा निधी शिल्लक कसा राहिला, मग बाकीच्या गप्पा कशाला हाणता, असं म्हणत लोखंडे यांनी निशाणा साधला आहे.