Guhagar Politics: विधानसभेत गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या मतदारसंघात आता शिंदे गटाने नवी खेळी खेळली आहे. श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत विपुल कदम (Vipul Kadam)यांचे उमेदवारीसाठी नाव आघाडीवर होते. मात्र, रामदास कदमांच्या विरोधामुळे राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, विधानसभेत राजेश बेंडल यांचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आता गुहागर मतदारसंघात शिवसेनेच्या पुर्नबांधणीसाठी शिंदेगटाकडून भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात नवी खेळी खेळली जात असल्याचं बोललं जातंय. विपुल कदम गुहागर विधानसभा मतदार संघात सक्रिय आहेत.
गुहागर मतदारसंघात कसे आहे पक्षीय बलाबल?
गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजेश बेंडल (Rajesh Bendal) यांना उमेदवारी देण्यात आली होती, पण गुहागरमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यंदाही बहुमताने निवडून आले होते. गुहागर विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 2 लाख 39 हजार 663 मतदारांपैकी 59.6 टक्के म्हणजे 1 लाख 40 हजार 647 मतादारांनी मतदान केलं. यापैकी भास्कर जाधव यांना 56 टक्के म्हणजे 78 हजार 748 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव बेटकर यांना 52 हजार 297 म्हणजे एकूण झालेल्या मतदानापैकी 37.2 टक्के मिळाली. पण, सध्या बेटकर शिंदेंच्या शिवसेनेत आहेत.
दरम्यान, विधानसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळावी अशी अपेक्षा होत असताना भाजपने शिंदे गटाच्या आणखी एका नेत्याला ऑफर दिल्याचीही चर्चा होती. यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. यानंतर त्यांनी अशी कुठलीही ऑफर नसल्याचे सोशल मीडियावरून स्पष्ट केले होते. दरम्यान, आता गुहागरमध्ये समन्वयक म्हणून श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा: