मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कोणासोबत आघाडी करणार यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसेसोबत जाणार की काँग्रेस सोबत जाणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं. काँग्रेस आणि शिवसेनेनं सोबत घ्यावं, अशी इच्छा असल्याचं देखील शशिकांत शिंदे म्हणाले.

Continues below advertisement

शशिकांत शिंदे काय म्हणाले?

नैसर्गिक मित्राला सोडतोय असं कोणी सांगितलं नाही. आज आम्ही 122 लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 21 तारखेला मविआच्या नेत्यांसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ, असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले. काँग्रेसनं, शिवसेनेनं आम्हाला सोबत घ्यावं, अशी आमची इच्छा आहे. नाही घेतलं तर जे बरोबर आहेत त्यांच्यासोबत जाऊ, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. मविआ म्हणून लढताना ज्या जागा आमच्याकडे आहेत, त्या जागा देण्याच्या संदर्भात चर्चा करुन मार्ग निघावा, जागा देताना अडवू नये. सन्मानजनक तोडगा निघावा, असं शशिकांत शिंदे म्हणाले. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.    

राष्ट्रवादीला कोणत्या जागा अपेक्षित?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मुंबईतील  मालवणी, मालाड, धारावी, वांद्रे. मोहम्मद अली रोड, कुर्ला, कसाइवाडा, शिवाजीनगर मानखुर्द या ठिकाणच्या जागा मिळाव्या अशी अपेक्षा व्यक्त केलीय.

Continues below advertisement

दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून 227 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना एकत्र लढणार आहेत. भाजपनं एकनाथ शिंदेंच्या शिवेसनाला 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.तर, उद्धव ठाकरेंची शिवेसना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस सध्या मुंबई महापालिकेत एकला चलोच्या भूमिकेत पाहायला मिळतंय.

संजय राऊत काय म्हणाले? 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी शिवसेना आणि मनसे यांच्यात जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कालही चर्चा झाली आणि आज या चर्चेला पूर्णविराम मिळेल, असं म्हटलं. आज हा विषय संपेल अशी अपेक्षा आहे. ठाणे, डोंबिवली, पुणेही अंतिम टप्प्यात आहे. आमच्यात गोंधळ विसंवाद नाही. महायुतीत चाललंय तसं आमचं नाही. आमचं घर दोघांचे आहे. काँग्रेस सोबत नाही, शरद पवारांशी चर्चा सुरु आहे. ही आघाडीच सत्ताधारी यांच्यासमोर आव्हान उभे करेल,असं संजय राऊत म्हणाले.