पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क केल्याची आणि सत्तेत सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. शरद पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वगळून पक्षातील इतर सात खासदारांच्या (NCP MP) भेटी घेऊन त्यांना यासंबंधीची ऑफर दिल्याची माहिती होती. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. तर दुसरीकडे अनेक आमदार, खासदार, नेते सुरूवातीपासून आमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसने नेते अमोल मिटकरी यांनी केलं होतं, त्याचबरोबर शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अशी कोणतीच ऑफर मिळाली नसल्याचं आणि तटकरेंना (Sunil Tatkare) भेटलो नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काय म्हणालेत सुनील तटकरे?
'मी कधीही कुणाशी संपर्क साधलेला नाही. माध्यमांमध्ये माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत', अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवारांच्या खासदारांच्या भेटी घेऊन त्यांना ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती, त्यावर प्रतिक्रिया देताना तटकरेंनी इन्कार दिला आहे, मी कधीही कोणाला संपर्क साधला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, तर समोर आलेल्या चर्चा चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तर येणाऱ्यांचं स्वागत - अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क साधला गेला आहे, का त्यांना ऑफर दिली आहे का? याबाबत एबीपी माझाशी बोलताना पक्षाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले, 'प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच याबाबत माहिती देतील. दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना पक्ष बदलायचा असेल तर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असेल. तुतारी गटाचे जे सात- आठ खासदार निवडून आले आहेत. त्यांना जर खरंच आमच्यासोबत यायचं असेल तर सुनील तटकरेंसोबत संपर्क केला असेल. काही खासदार आणि काही आमदार सुरुवातीपासून आमच्या संपर्कात आहेत. जर कोणी येत असतील तर स्वागत आहे. त्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असं मिटकरी म्हणाले. सात- आठ खासदार येण्यासाठी इच्छूक असतील तर त्याचं स्वागत करतो. निलेश लंके तुमच्यासोबत खोटं बोलत आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. पक्ष जर मजबूत होत असेल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तर येणाऱ्यांचं स्वागत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. पक्ष मजबूत झाला पाहिजे, असं अमोल मिटकरींनी सांगितलं. दोन्ही बाजूच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये काही चर्चा झाली असेल तर त्या गुलदस्त्यात आहे. ते येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं मिटकरींनी म्हटलं.