पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा संस्थापक शरद पवार (sharad pawar) यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाल्यामुळे आजही या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी (NCP) व शरद पवार कायम आग्रही असतात. बारामतीच्या डोर्लेवाडी गावातील एका कार्यक्रमादरम्यान आज पुन्हा एकदा शरद पवारांचा महिला (Women) सक्षमीकरण आणि महिलांचे राजकारणातील स्थान याबाबतचा आग्रह दिसून आला. येथील कार्यक्रमात पाठीमागे बसलेल्या महिला सरपंचांना (Sarpanch) पुढे बोलावून भाषण करण्यास शरद पवारांनी सांगितले.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आल्यामुळे महिलांना ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती याठिकाणी लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात नाव महिलांचे असते, पण कारभार तिचा पतीच हाकत असतो. सरपंचपदी महिला असते, पण कार्यक्रमात सरपंचाच्या खुर्चीवर महिलेचा पती असतो. बारामतीधील एका कार्यक्रमात ही बाब लक्षात येताच, शरद पवारांनी संबंधितांचे चांगलेच कान टोचले.
आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली ती मागे बसायला दिली का? अशा शब्दात शरद पवारांनी डोर्लेवाडीच्या महिला सरपंचांना प्रश्न केला. शरद पवार आज बारामती डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी, कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सरपंच यांचे पती पुढे बोलत होते. म्हणून, शरद पवारांनी विचारलं सरपंच कुठं आहेत? सरपंचाला पुढे बोलवा असे आदेशच शरद पवार यांनी दिले. डोर्लेवाडीच्या महिला सरपंच पुढे आल्यावर शरद पवारांनी त्यांना याबाबत विचारणा देखील केली. आम्ही तुम्हाला सत्ता दिली आहे, ती मागे बसायला दिली का, असा परखड सवाल महिला सरपंचांना विचारला आणि महिला सरपंचास पुढे बसवलं. शरद पवारांच्या या कृतीचं डोर्लेवाडी गावात कौतूक करण्यात येत असून आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्या या कृतीचं कौतूक होत आहे.
रयत शिक्षण संस्थेला निधी
माझ्या वडिलांनी माझं नाव एमईएस शाळेतून काढले आणि मला रयतच्या शाळेत टाकलं. परदेशात देखील मला रयतमध्ये शिकलेले विद्यार्थी-विद्यार्थीनी भेटतात. रयतकडून संस्थेसाठी मी दीड कोटी रुपये निधी देतो, अजून एक संस्था आहे त्याच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे आहेत, त्यांच्याकडून 3 कोटी रुपये दिले, असे म्हणत शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी देण्यात येत असलेल्या आर्थिक निधीसंदर्भात माहिती दिली. तसेच, माझे डोर्लेवाडी गावात अनेक वर्गमित्र आहेत, या गावात मी कधी मत मागितले नाही, पण तुम्ही कधी द्यायला विसरला नाहीत, असेही शरद पवार यांनी म्हटले.