Sharad Pawar:बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले. या घटनेचे पडसाद राज्याच्या विधीमंडळातील हिवाळी अधिवेशनातही उमटल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उतरले असून बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणेंना घेऊन ते मस्साजोग गावात पोहोचले आहेत. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसोबत ते चर्चा करत असून या प्रकरणी ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण तापलंय. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणी संसदेच्या मकरद्वारावर आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आम्ही आंदोलन केलं. या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधून त्याला शिक्षा व्हावी, खुनाचा कट कोणी रचला याची माहिती पोलिसांनी दिली पाहिजे. पीएसआयला निलंबित केलं. त्याला सहआरोपी केलं पाहिजे ही माझी मागणी आहे. कारण तो पीएसआय आरोपी सोबत चहापान करत होता, असंही यावेळी त्यांनी म्हटलंय. त्यानंतर आता शरद पवारांसोबत मस्साजोगमध्ये दाखल झाल्याने ते काय बोलतात हे महत्वाचं ठरणार आहे.
सरपंचांच्या हत्येवर मुख्यमंत्री काय म्हणाले?
विधानसभेत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच हत्या प्रकरणावर उत्तर दिलं. सरपंच हत्येचा गुन्हा ज्याने केलाय, त्यावर कोणीही असला तरी कारवाई केली जाईल, असं म्हटलं. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेऊन सांगतो. एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर कारवाई होणारच, कोणालाही सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत वाल्मिक कराड याचं नाव घेऊन त्यांचा पत्ता देतो, त्यांना अटक करणार का अशी भूमिका व्यक्त केली.दरम्यान, शरद पवारांची मस्साजोग गावातील हजेरी महत्वपूर्ण मानली जात आहे.