मुंबई : ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Jyotirmatha shankaracharya Avimukteshwaranand) यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांचा पाहुणचार स्वीकारला. या भेटीवेळी बोलताना, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे,  जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दु:ख जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने भाजपकडून हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप केला जात आहे. आता, ज्योतीर्मठाच्या शं‍कराचार्यांना घरी बोलावून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपाला अस्सखलीत उत्तर दिलंय. त्यामुळे, या भेटीवर भाजपची नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता, भाजप मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, शं‍कराचार्यांवर बोलण्याची आपली लायकी नाही, असेही ते म्हणाले. 


ज्योतीर्मठाचे  शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली.कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो, असे  शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले होते. तसेच, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत दु:ख जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. आता, शंकराचार्यांच्या विधानावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''मी त्यांच्या विधानावर टिप्पणी करणार नाही, माझी तेवढी लायकी नाही. पण मुंबई व महाराष्ट्रात स्पष्टता आहे की, उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले आहे. ठराविक मतांचं लांगुलचालन करण्यासाठी त्यांनी हिंदूत्व व बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत,'' अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली. त्यामुळे,  ठाकरे आणि शंकराचार्य यांच्या भेटीनंतर भाजपची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे. प्रतिक्रिया देतानाही, प्रतिक्रिया टिप्पणी करणार नाही, असे त्यांना म्हणावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 


काय म्हणाले शंकराचार्य


आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे . सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे , याबाबतची पीडा अनेकांना आहे. त्यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो   त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर परत बसत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही. कोणाचं हिंदूत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो.  जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो.  जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे.