मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून लवकरच जागावाटप घोषित होऊ शकते. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलंय. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय (transgender) असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. 


राज्यात यंदाच महायुती, महाविकास आघाडी, त्यानंतर संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वातील आघाडीनेही मोट बांधली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीनेही एकला चलो रे चा नारा देत विधानसभेसाठी 11 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केलीय. त्यामध्ये रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलंय. शमिभा या तृतीयपंथी उमेदवार असून महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार म्हणून त्या विधानसभा निवडणूक लढणार आहेत. 


कोण आहेत शमिभा


श्याम मीना भानुदास पाटील यांनी आता शमिभा हे नाव धारण केलं आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या सक्रीय पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. राज्यातील तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आणि मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी लैंगिक ओळख सार्वजनिक केली होती. त्यानंतर, जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाला एकत्र करण्याचं काम त्यांनी त्यांनी केलं असून आजही ते सुरू आहे. तृतीयपंथीयांचे शिक्षणाचे प्रमाण केवळ 0.3 टक्के आहे, त्यामुळे, तृतीयपंथीयांच्या शिक्षण हक्कासाठी त्या लढत आहेत. महाविद्यालयीन नाटकांमध्येही शमिभा यांनी  स्त्री पात्राची भारदस्त भूमिका साकारल्या होत्या. शमिभा या सामाजिक कार्यात अग्रेसर असतानाही शिक्षणाप्रती अतिशय संवेदनशील आहेत. म्हणूनच पीएचडीसारखी सर्वात मोठी पदवी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा विषय घेऊन त्या पीएचडी करत आहेत.  


वंचितकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर



  • रावेर - शमिभा पाटील

  • सिंधखेड राजा - सविता मुंडे 

  • वाशीम - मेघा डोंगरे

  • धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा

  • नागपूर साऊथ वेस्ट -  विनय भांगे

  • डॉ. आविनाश नन्हे - साकोली

  • फारुख अहमद - दक्षिण नांदेड

  • शिवा नरांगळे -लोहा

  • विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)

  • किसन चव्हाण - शेवगाव

  • संग्राम माने - खानापूर 


ऑक्टोबर 12  पर्यंत निवडणुकीचे नोटिफिकेशन निघेल असं गृहित धरुन चाललो आहे. 15 नोव्हेंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावं लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावं लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


हेही वाचा


पुणे-मुंबई एक्सप्रेस वे करताना माझी चूक; गडकरींनी सांगितला अधिकाऱ्यांचा किस्सा