Sarangi Mahajan on Pramod Mahajan: गोपीनाथ मुंडे यांनी न्यायालयात प्रवीण महाजन यांच्याविरोधात साक्ष दिल्याने मी त्यांच्या मुलीवर आरोप करते, हा प्रवीण महाजनांचा आरोप अयोग्य आहे. मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची बदनामी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्यायालयीन खटला एकीकडे आणि वारसा हक्काचा मुद्दा एकीकडे. मी जे काही बोलले त्याचा गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या साक्षीशी काहीही संबंध नाही. मी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बिघडलेली मुलगी म्हटले ते राजकारणासंदर्भात होते. पंकजा मुंडे या व्यक्तिश: खूप चांगल्या व्यक्ती असू शकतात, त्या मनाने कोमल असू शकतात. पण ती राजकारणात बिघडलेली आहे. लोकांच्या नजरेत ते दिसते. मी कोणावरही व्यक्तिश: आरोप केलेले नाहीत. वारसा हक्काविषयी मी जे बोलले ते, मी सामाजिक मुद्द्याला धरुन बोलले, असे वक्तव्य प्रवीण महाजन (Pravin Mahajan) यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केले. त्या सोमवारी 'एबीपी माझा'शी बोलत होत्या. यावेळी त्यांनी प्रकाश महाजन यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. (Sarangi Mahajan)
प्रवीण महाजन हे प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करत होते, त्यांची हत्या पैशांच्या हव्यासातून झाली आहे, हा प्रकाश महाजनांचा आरोप खोटा आहे. आम्ही प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल करत असतो तर आज आम्ही सी-फेसला बंगला घेऊन राहिलो असतो. त्यामुळे प्रमोद महाजनांची हत्या ही पैशांसाठी झालेली नाही. प्रकाश महाजन हे औरंगाबादला राहतात. प्रकाश महाजन जे बोलत आहेत, ते त्यांच्या तोंडचे शब्द नाहीत. ते असं बोलू शकत नाहीत, त्यांचं आमच्याशी रक्ताचं नातं आहे. हे त्यांना कोणीतरी सांगितलं आहे. कदाचित मुंडेंच्या घरातून त्यांना असे बोलण्यासाठी सांगितले आहे, असे मला वाटते, असा संशय सारंगी महाजन यांनी व्यक्त केला.
माझ्या पतीने प्रमोद महाजन यांना अजिबात ब्लॅकमेल केले नाही. उलट दोन्ही भावांमध्ये प्रचंड प्रेम होते. माझे पती प्रमोद महाजन यांच्याकडे हक्काने हवे ते मागू शकत होते आणि मागतही होते. प्रमोद महाजनही मागितलेल्या गोष्टी देत होते. माझ्या पतीने नोकरी मागितली तेव्हा प्रमोद महाजन त्यांच्यासाठी शब्द टाकायचे. या सगळ्यावर मी सविस्तर बोलेन. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मला यावर तुर्तास जास्त बोलता येणार नाही, असे सारंगी महाजन यांनी म्हटले.
Pramod Mahajan: प्रमोद महाजनांना स्वत:चं घर सांभाळता आलं नाही, त्यांनी देश काय सांभाळला असता? सारंगी महाजनांचा सवाल
महाजन परिवारातील लढाई ही मानपमानाची आहे. प्रवीण महाजन यांचा अपमान व्हायचा. महाजन भाऊ-बहिणींची पैसेवाले आणि पैसे नसणारे अशी विभागाणी झाली होती. अनेकजण म्हणतात, आज प्रमोद महाजन असते तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते. पण माझा सवाल हा आहे की, आमच्या घरातलं त्यांना निस्तरता आले नाही, ते घराला सावरु शकले नाहीत, ते देशाला कसे सांभाळू शकले असते? त्यांनी घराला कुठे सावरलं? प्रकाश महाजन माझ्याकडे केस लढवण्यासाठी महागडा वकील नेमण्यासाठी पैसा कुठून आला, असा प्रश्न विचारतात. पण तो पैसा तुमच्या घरातील नव्हता, तो माझ्या माहेरुन आला होता. आम्ही परदेशात फिरलो ते स्वत:च्या पैशांनी फिरलो, असेही सारंगी महाजन यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा