बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड (Beed) पोलिसांनी 90 दिवसांच्या आत दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल केले असून या हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच (Walmik karad) असल्याचे त्यात नमून केले आहे. त्यामुळे, वाल्मिक कराड हाच या घटनेतील मुख्य आरोपी असून मंत्री धनंजय मुंडेंच्या तो जवळचा आहे. पोलिसांनी तब्बल 1 हजार पानांचं हे चार्जशीट दाखल केलं असून त्यातून नवनवीन खुलासे व हत्याप्रकरणाशी इतंभू माहिती समोर येत आहे. ॲट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख आरोपपत्रातून करण्यात आला आहे. त्यानंतर, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसे राजकारणात असली तर अनेक वाल्मिक कराड तयार होतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. तर, सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यातच, संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ कशाप्रकारे आरोपींनी एन्जॉय केला हे दोषारोपपत्रातून समोर आलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये व्हाट्सअप कॉलचा व्हिडिओच महत्त्वाचा पुरावा ठरल्याचे सीआयडी पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमधून या व्हिडिओबाबत खुलासा करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर मारहाण करतानाचा व्हिडिओ कृष्णा आंधळे यांनी एका व्हाट्सअप ग्रुपवरती शेअर केला होता. मोकारपंती असं या व्हाट्सअप ग्रुपचं नाव होतं, ज्यामध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण होती हे पाहिले होते. फॉरेन्सिक विभागाकडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे दहा ते बारा व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडिओमधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्ती यांची फॉरेन्सिक तपासणी झाल्याचे संतोष देशमुख हत्याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रातून समोर आले आहे. 

दरम्यान, या व्हिडिओतील काही फोटो हे आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत, ज्यामध्ये सुदर्शन खुले हा कशाप्रकारे संतोष देशमुखला मारहाण करतोय हे दिसून येते. सगळ्यात वाईट म्हणजे संतोष देशमुख यांचे कपडे काढल्यानंतर कशाप्रकारे त्यांना वागणूक दिली हे सुद्धा या फोटोच्या स्वरूपातून दोषारोपपत्रातून दिसून येत आहे. व्हिडिओ बनवत असताना सुदर्शन घुले, त्यानंतर सुधीर सांगळे आणि प्रती घुले हे हसत हसत मारहाण करताना या फोटोतून पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा

पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन पकडलं, कंटेनरसह चालक ताब्यात; सिंडीकेट मेंबर पुष्पाचा शोध सुरू