मालेगाव, नाशिक: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shiv Sena ) यांनी मालेगाव कोर्टात (Malegaon Court) हजेरी लावली. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गिरणा सहकारी कारखान्याच्या (Girna Sugar factory) माध्यमातून शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले, त्याचा हिशेब द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यावरुन दादा भुसे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी आज पार पडली. आजच्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही नेत्यांना तडजोड करु शकता का असं विचारलं. त्यावर संजय राऊत यांनी नाही म्हणून सांगितलं. आता याप्रकरणी  3 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी संजय राऊत यांना हजर राहण्याचे आदेश दिले. 


संजय राऊत काय म्हणाले? (Sanjay Raut on Dada Bhuse)


तक्रारदार आणि आरोपी यांनी लोकअदालतीत बसून खटला मिटवावा असं कोर्टाचं म्हणणं आहे.पण चोराला चोर म्हणण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. चोराला महात्मा मी म्हणू शकत नाही, तो घटनेचा अपमान होईल. तुम्ही अद्वैय हिरेंना तुरुंगात टाकता, मग दादा भुसेंचा 178 कोटींचा घोटाळा असताना तुम्ही त्यांना अटक का करत नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. 


न्यायालयात नेमकं काय झालं? 


संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टाने 9 तारखेला राष्ट्रीय लोक अदालत आहे, तुम्ही दोघे लोकप्रतिनिधी आहात एक पायंडा पडता येईल तुम्ही तडजोड करू शकत, त्यासाठी तयार आहेत का? अशी विचारणा दोन्ही नेत्यांना केली. 


त्यावर संजय राऊत म्हणाले, "खटला मी दाखल केला नाही, खटला त्यांनी दाखल केला. हा खटला सुरू ठेवा" 


न्यायालय म्हणाले, तुम्हाला मी गुन्हा वाचून दाखविला आहे. तुम्हाला गुन्हा कबूल आहे का? यावर संजय राऊतांनी  नाही असं सांगितलं.  


यानंतर कोर्टाने  दादा भुसे यांच्या वकिलांना  तुम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहेत का? असं विचारलं. वकील म्हणाले, आरोपी तयार नाहीत. 


यानंतर न्यालायाने दोघांना खडे बोल सुनावले. शासनाच्या धोरणानुसार लोक अदालत घेतली जाते. तुम्ही लोकप्रतिनिधी असूनही तडजोडीला तयार नाही?  असं न्यायालय म्हणाले.


संजय राऊत वि दादा भुसे मानहानी खटला (Sanjay Raut vs Dada Bhuse)


पालकमंत्री दादा भुसे यांनी खा.संजय राऊत यांच्यावर दाखल केलेल्या  मानहानी दाव्यावर आज मालेगाव न्यायालयात सुनावणी झाली. त्यासाठी खासदार राऊत आज मालेगाव न्यायालतात हजर राहिले. 4 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीवेळी खा.राऊत हे  मराठा आरक्षणाचे कारण देऊन गैरहजर होते. यानंतर न्यायालयाने त्यांना जामीनपात्र वॉरंट बजावत 2 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.2 डिसेंबरला हजर न राहिल्यास त्यांना पकड वॉरंट बजावण्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले होते. 


178 कोटी रुपयांचा गैरव्यवहाराचा आदेश 


मालेगावच्या दाभाडी येथील गिरणा साखर कारखाना वाचविण्यासाठी, जमा केलेल्या शेअर्समध्ये मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप खा.संजय राऊत यांनी केला होता. दै.सामनामध्ये तसे वृत्त प्रकाशित केले होते. मंत्री भुसे यांनी खा.राऊत यांना नोटीसद्वारे याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले होते. मात्र राऊत यांनी कुठलेही पुरावे सादर न केल्याने खा.राऊत यांचे विरोधात मालेगाव न्यायालयात मानहानीचा फोजदारी दावा दाखल केला होता. 


VIDEO :  संजय राऊत नेमकं काय म्हणाले?



 


संबंधित बातम्या