Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. याआधी अवघ्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, शिंदे यांचा एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे. अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, धर्मक्षेत्रात, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असतो. त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. कारण दिवसरात्र ते अघोरी विद्येत गुंतलेले असतात. दुसऱ्याचं आणि राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल? ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात जेव्हा आपण पुरोगामी म्हणून मिरवतो, त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य आता समोर येत आहेत. महाराष्ट्राचे राजकारण जर अशा लोकांच्या हातात असेल तर हे शाहू-फुले- आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत? देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून बघायला पाहिजे नक्की काय आहे? काहीही होऊ शकते, असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत यांचा गंभीर आरोप
संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृती आहे. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला. महाराष्ट्राने धर्मांधतेविरुद्ध लढा दिला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते जसे मंत्र्यांचे पीए तपासून घेत आहेत, तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे. हे असे अघोरी विद्येत रममान असलेले मंत्री महाराष्ट्राचे काय भले करणार? ही अघोरी विद्या जी सुरू आहे ती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा, यासाठी हे अघोरी विद्येचे प्रकार एसंशि गटाचे लोक ठिकठिकाणी करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
या राज्याचे मंत्रिमंडळ कोणत्या मानसिकतेमध्ये?
संजय राऊत पुढे म्हणाले की, मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. पण हे समोर येत आहे. कोणत्या मानसिकतेमध्ये या राज्याचे मंत्रिमंडळ आहे? महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणाशी यांना काही पडलेले नाही. जनतेच्या प्रश्नाचे काही पडलेले नाही. लोकशाही आणि विचारांचे काही पडलेले नाही. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणं, मी हा शब्द मुद्दामून वापरत आहे. कारण हा शब्द इराण इज्राईल युद्धामध्ये आला आहे. इज्राईलने इराणच्या काही प्रमुख नेत्यांना एलिमिनेट केले आहे, असे त्यांनी म्हटले.