Sanjay Raut on Girish Mahajan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि निवडणुका जिंकणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक येथे व्यक्त केला. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी घोडामैदान जवळ आहे. उगाच काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही. त्यांना एकत्र यायचंय, एकत्र यावं. लोकशाही आहे. कुणीही एकत्र येऊ शकतात, कुणीही वेगळे होऊ शकतात. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या एखाद्या ठिकाणी तरी त्यांनी निवडून येऊन दाखवावं, अशा शब्दांत संजय राऊत यांना आव्हान दिलं. आता खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. 

संजय राऊत म्हणाले की, गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही. काहीही बोलावं आणि काहीही करावं. स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्यांनी पाहावं. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल? ते कुठे असतील? याचा त्यांनी विचार करावा. तोंडाच्या वाफा कोण दवडतंय आणि कोण नाही हे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. या लोकांना रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल. हे जे चोर, लफंगे, दरोडेखोर फडणवीस यांच्या सभोवताली आहेत, त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल, हे मी गिरीश महाजन यांना खास सांगू इच्छितो, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

आमच्या नादाला फार लागू नका

संजय राऊत पुढे म्हणाले की,  मिस्टर महाजन आज तुमची मस्ती आहे ती लुटलेल्या पैशांची आणि सत्तेची आहे. तुम्ही म्हणजे प्रमोद महाजन नाही. तुम्ही जामनेरचे गिरीश महाजन आहात. तुम्ही आत्मचिंतन करा आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत. मग तुम्ही ठाकरे कुटुंबावर बोला. आमच्या नादाला फार लागू नका. सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात, असेही त्यांनी म्हटले. 

शिंदेंचा मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो

दरम्यान, राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी 'एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे,' असा टोला लगावला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, गणेश नाईक हे एकेकाळचे आमचे सहकारी होते आणि ते संयमी आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी मी आत्तापर्यंत इतक्या वर्षात कधी ऐकले नाही की त्यांनी कधी शिवसेनेवर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका केली. अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावर प्रतिटीका केली नाही. हे पथ्य त्यांनी पाळले आणि ते अत्यंत महत्त्वाचे असते. 

काल ते म्हणाले कोणालातरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकार सुद्धा लॉटरी चालवत होतं. पण, आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. फडणवीस मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जात आहे. गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका असेल. मुख्यमंत्रीपदाचा उपमुख्यमंत्रीपदाचा मटका लागलेला आहे तो सांभाळून ठेवला पाहिजे. पण मटक्याचे आकडे चंचल असतात. शिंदेंचा मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो. त्यांना आकडा संभाळता येत नाही. नाईकांना कधी मटका लावता आला नाही. नाईकांनी प्रवाह बदलला पण ते प्रवाहात आहेत. नाईकांनी त्यांचे वक्तव्य ठाण्यात केलं हे विशेष आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. 

आणखी वाचा 

Rohit Pawar on Gopichand Padalkar : चंद्रकांतदादा तुम्ही भाजपचं सोनं आहात, खऱ्या सोन्यांनी दखल घेण्याची गरज, सांगलीतील बेन्टेक्स खालच्या थरावर बोलत आहे; रोहित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल