Audio clip of Sanjay Raut: शिवसेना नेते आणि खासदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना काही तासांपूर्वी ईडीने ताब्यात घेतले आहे. आता त्यांच्याविरोधात व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ऑडिओ क्लिप प्रकरणी वाकोला पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा एफआयआरमध्ये वर्ग केला आहे. यापूर्वी तो अज्ञात व्यक्तीविरुद्ध होता. मात्र आता खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. स्वप्ना पाटकर आज वाकोला पोलीस ठाण्यात जबाब घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. स्वप्ना पाटकर यांनी एका महिला अधिकाऱ्याने आपल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वाकोला पोलिसांना ईमेल पाठवला होता. त्यानुसार वाकोला पोलिसांकडून एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आल्या असून त्या या प्रकरणाचा तपास करून जबाब घेणार आहे. 

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत स्वप्ना पाटकर यांच्या लेखी तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 507 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. आवाजाची पुष्टी करण्यासाठी पोलीस ऑडिओ क्लिपची अधिक छाननी करत आहेत.

Continues below advertisement

काय आहे प्रकरण?

या 70 सेकंदाच्या ऑडिओ किल्पमध्ये 26 शिव्या देण्यात आल्या आहेत. जी आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यात संभाषण आणि शिवीगाळ करत असलेली व्यक्ती संजय राऊत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र नेमकं काय आहे यातील प्रकरण. तर मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या जमिनीमधून 1 हजार 34 कोटींचा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या मुख्य साक्षीदार आहेत. त्यांना साक्ष मागे घेण्यासाठी संजय राऊत धमकावत असल्याची तक्रार पाटकर यांनी केली आहे.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या दादर येथील घरी छापेमारी केली. यावेळी ईडीने राऊत यांच्या घरी 9 तास तपासणी केली. या तपासणीदरम्यान ईडीने त्यांच्या घरातून काही कागदपत्रे आणि 11.50 लाख रुपये रोकड जप्त केली. यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन आपल्या कार्यलयात घेऊन गेली. तिथे त्यांची चौकशी अद्यापही सुरू आहे. त्यांना ईडी अटक करणार का? हे चौकशी पूर्ण झाल्यावर समजू शकणार आहे.