मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन भाष्य केले. आता अशोक चव्हाणही (Ashok Chavan) काँग्रेस आमदारांचा गट फोडून संपूर्ण पक्ष आणि हात या चिन्हावर दावा करणार का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते. चर्चा करीत होते, आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट फोडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्या ताब्यात घेतले होते. तर काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा गट फोडून संपूर्ण पक्ष आणि घड्याळ चिन्ह हस्तगत केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
अशोक चव्हाणांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का
अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून असल्याचे सांगितले जाते. भाजप पक्षश्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांना राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर दिल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करतील त्यावेळी त्यांच्यासोबत मराठवाडा आणि मुंबईतील काही काँग्रेस आमदारही असतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी सात ते आठ आमदार काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा आहे.
राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांचं पहिलं ट्विट
आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आणखी वाचा
अशोक चव्हाणांनी काँग्रेस आणि आमदारकीही सोडली, राजीनामापत्र 'माझा'कडे, भाजप प्रवेशावर शिक्का!