Sanjay Raut PC : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरील भूखंड घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रे पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रे गेली आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शिंदे यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सारवासारव करत असल्याचा आरोपही त्यांनी के आहे. राजधानी दिल्लीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्यावरही निशाणा साधला.


नागपुरातील भूखंड घोटाळ्यावरुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशन दणाणून सोडलं. विरोधकांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु असतानाच ठाकरे गटाने दिल्लीतही शिंदे यांच्याविरोधात हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांकडेच एकनाथ शिंदे यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.


'देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीत आले'


मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीत आले आहेत. ते कशाला आले माहित नाही? पण नक्कीच त्यांची त्याविषयी चर्चा झाली असावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 110 कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतील बिल्डरांना 2 कोटी रुपयांना दिले. जे 16 भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. त्यावर काही निष्कर्ष काढण्यात आले होते. तेव्हा भूखंड वाटपाला विरोध झाला होता. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने भूखंड वाटप केलं होतं. त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. आता भलेही न्यायालयाचं समाधान झालं असेल फक्त 24 तासात, तरीही तो भ्रष्टचार आहे, असं संजय राऊत म्हणाले. 


अण्णा हजारे गप्प का?


राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला तरीही अण्णा हजारे या विषयावर गप्प का आहेत? असा प्रश्न मी नाही तर समाजमाध्यमातून विचारला जात आहे.  सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. 110 कोटींचं नुकसान झालं, 16 भूखंड बिल्डरांच्या घशात गेले तरी त्यावर कोणी काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.


VIDEO : Sanjay Raut Full PC : दुतोंडी साप ते खोके सरकार, संजय राऊत यांचा अण्णा हजारे यांनाही सवाल