Sanjay Raut : हे जे सरकार आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम जे आहेत, ही महाराष्ट्राला आलेली टेंगूळ आहेत. हे सह्याद्रीची उपमा स्वतःशी करत आहेत म्हणजे हे हास्यास्पद असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, प्रगतीचा पाढा वाचणे आणि प्रगती पुस्तकावर शेरा असणे, यात फरक आहे. त्यांना पाढे वाचायला काय झालं आहे? कुठे आहे महाराष्ट्र? जो महाराष्ट्राचा एक बाणा होता, कणखर, खणखणीत, बाणेदार. आता दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला आहे. हे आता काय होर्डिंग लावत आहेत? सह्याद्री चाललेला आहे. कोण सह्याद्री? हिमालय कोण? हिमालय दिल्लीमध्ये उरला आहे का? महाराष्ट्रात सह्याद्री कोण? हे जे सरकार आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम जे आहेत, ही महाराष्ट्राला आलेली टेंगूळ आहेत. एक टेकडा आणि दोन टेंगूळ आहे. मुख्यमंत्री टेकडा आणि दोन डेप्युटी सीएम टेंगूळ आहेत. हे सह्याद्रीची उपमा स्वतःशी करताहेत म्हणजे हे हास्यास्पद आहे. अरे कुठे बाळासाहेब ठाकरे कुठे? माननीय शरद पवार हे देशाचे रक्षा मंत्री होते. कुठे वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक? अरे तुम्ही कोण? हे टेंगूळ आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र किती कमजोर झाला, यांची श्वेतपत्रिका काढा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारचं 100 दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अमेरिकेत ट्रम्पने पण शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. या काळात महाराष्ट्र किती कमजोर झाला आहे याची तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा. आपापसात संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर झाला. 106 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही, लायकी हा मी शब्द वापरणार नाही. 106 हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तीन वर्षात संपवून टाकला. हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणारा आणि व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केलाय, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
सरकार मोदी की आणि सिस्टीम राहुल की
दरम्यान, मोदी सरकारने कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत आगामी जनगणनेमध्ये जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून राहुल गांधी सातत्याने जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. त्यांचे पार्लमेंटमधील जाहीर भाषण बघा. यांच्या कानात बोळे भरले आहेत का? भारतीय जनता पक्षाची पार्लमेंटमधली भाषण बघा. जातीय जनगणनेला कोणी विरोध केला हे पार्लमेंटमधला रेकॉर्ड तुम्हाला सांगतो. हा एक सामाजिक न्यायाचा विषय आहे. या देशाच्या बहुजन समाजासंदर्भातला हा निर्णय महत्त्वाचा आहे. हा निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण कॅबिनेटने हा जो निर्णय घेतला त्याचा संपूर्ण श्रेय या देशातील जनता आणि बहुजन समाज दलित शोषित पीडित याचं श्रेय फक्त राहुल गांधी यांना देतात. आता ह्यांच्या पोटात दुखत त्याला आपण काय करणार? सरकार मोदी की आणि सिस्टीम राहुल की चाललेली आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा