Sanjay Raut : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने (Heavy Rain) कहर माजवला असून अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, पुण्याचा घाटमाथा, रायगड, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रावर संकट कोसळले आहे आणि आताही कोसळत आहे. या प्रकारचा तुफानी पाऊस आता सुरू आहे. सरकारने 24 तास काम केले पाहिजे. सरकार कुठे आहे? मुंबईमध्ये लोकांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहता यावा म्हणून गृहमंत्र्यांनी सुरक्षेसंदर्भात खास सूचना दिल्या आहेत. जर कोणी भारत-पाकिस्तान सामना रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये लावला असेल तर त्यांना संरक्षण द्या. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संरक्षण नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षासह अनेक लोक त्या निवडणुकीमध्ये गुंतून पडले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
नरेंद्र मोदी, अमित शाहांनी मराठवाड्याचा दौरा करावा (Sanjay Raut on PM Modi and Amit Shah)
संजय राऊत पुढे म्हणाले की, धाराशिवचे पालकमंत्री एकदा दोन टेम्पो घेऊन गेले, फोटो लावून गेले. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी ठाण मांडून बसण्याची गरज असताना, ते मुंबईत काय करत आहेत? तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत केली, हे मला दाखवा. आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत. तुम्ही काय मदत केली हे दाखवा. आम्हाला काय विचारत आहात, तुम्ही काय केलं म्हणून. सरकार तुमचं आहे. भोXXXX सरकार कोणाचं आहे? आमचा आहे का? तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारत आहात? हXXXX लोक आहेत. आम्हाला प्रश्न विचारत आहात. सत्ता कोणाची? तिजोरी कोणाच्या हातात? जनता शिव्या घालत आहे म्हणून माझ्या देखील तोंडातून शिव्या आल्या. निर्लज्जपणाचा कळस आहे. उद्या अमित शहा येणार आहेत. नरेंद्र मोदी येणार आहेत. आता हे त्यांच्या मागे धावत जाणार आहेत, अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी इकडे यावं आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी हे पंतप्रधानांना कळत नाही का? पंतप्रधानांनी मराठवाडा दौरा करावा. भले हेलिकॉप्टरने करावा. पण करावा. अमित शाहांनी हेलिकॉप्टरने दौरा करावा. पाहा लोकांचा आक्रोश काय आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
आणखी वाचा