Sanjay Raut on Eknath Shinde : मुंबईत शुक्रवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकमेकांची थेट नावे न घेता जोरदार टीका केली. वरळी येथे आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संभाव्य युतीवर टीकास्त्र सोडले. हिंदुत्व आणि मराठी माणसांशी विश्वासघात केल्यामुळे ते माझ्याशी युती करता का? माझ्याशी युती करतात का? म्हणत किती आगतिक, उतावळे आणि लाचार झाले आहेत, हे आपण पाहत आहात, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. 

Continues below advertisement

संजय राऊत म्हणाले की, आम्ही कोणासोबत युती करावी हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतो आहे? दोन पक्ष एका विचारधारेचे आहेत, ते ठरवतील. महाराष्ट्रातील जनता ठरवले, तुमचा तिळपापड का झाला? तुमची आघोरी विद्या तुम्हाला साथ देत नाही का? फडणवीस यांनी तुमचं पाय पुसणं केलं आहे. या लोकांना रात्री झोपा लागत नाही, असे त्यांनी म्हटले. 

शिंदेंनी ठाकरेंबाबत जे शब्द वापरले त्याची नोंद आम्ही ठेवली

एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत मेलेल्यांना काय मारायचे अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली होती. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या तोंडात जी भाषा आहे, ती अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे. ते अघोरी लोक आहेत.  ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसले, त्यांच्याबद्दल तुम्ही अशी वाक्य वापरत आहात. शिंदे यांची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे. दिल्लीत जाऊन अमित शाह यांची बूट चाटेगिरी करताय, तुम्ही मेलेलेच आहात. तुम्ही भाजपमध्ये जाऊन जी नवीन संस्कृती स्वीकारली, त्याला शोभणारी ही भाषा आहे. लोकसभेत तुम्ही मेलेले होतात. पण विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिवंत झालात.  तुम्ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जे शब्द वापरले त्याची नोंद आम्ही ठेवली आहे.  त्याच पद्धतीने त्याचे उत्तर दिले जाईल, असा हल्लबोल देखील त्यांनी केला. 

Continues below advertisement

ठाकरे ब्रँड हा देशातील सुप्रीम ब्रँड

संजय राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हा विषय वारंवार घेतला आहे. राज ठाकरे यांच्या युती संदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत आहे. ठाकरे ब्रँड हा देशातील सुप्रीम ब्रँड आहे.  एकनाथ शिंदे, फडणवीस आणि कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा

Uddhav Thackeray VIDEO : उद्धव ठाकरेंची वर्धापन दिनी मोठी घोषणा, राज ठाकरेंसोबत युतीसाठी पुढचं पाऊल, शिंदे-भाजपला म्हणाले, Come on Kill me!