Sanjay Gaikwad: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad Canteen Video) यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला. आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांच्या या व्हिडीओनंतर आता आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या मालकावर सरकार मेहरबान आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण अंजता कॅटर्स हे अनेक वर्षांपासून ते कॅन्टीन चालवत आहेत. मुदत संपल्यानंतर ही पाच वर्षांपासून हे कॅटर्स का सुरु आहे. त्यामुळे नियमांना बगल देत अनेक वर्षांपासून दक्षिण भारतीय असलेल्या कॅटर्सवर सरकार मेहरबान असल्याचं बोललं जात आहे. 

कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर न काढता वाढीव मुदत-

सदर कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर मनोरा आमदार निवासात होत. मात्र मनोरा आमदार निवास तोडल्यानंतर या कॉन्ट्रॅक्टरला आकाशवाणी आमदार निवास देण्यात आलं. आकाशवाणी आमदार निवास 2018 ला चालवायला दिल होतं, यांची मुदत 2020 पर्यंत होती. मात्र 2020 पासून ते आतापर्यंत टेंडर न काढता वाढीव मुदत देण्यात आली. त्यामुळे हे टेंडर का काढलं नाही? असा प्रश्न समोर येत आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा...अशा लोकांचा तुम्ही पाठींबा देणार का..अशा आमदारांचं निलंबन करावं, अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. यावर मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही.अशा मारहाणी मुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले. 

आमदार गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला धू धू धुतलं-

आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं , पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्याने संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली.

नेमकं काय घडलं?

काल (8 जुलै) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली.

कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर संजय गायकवाड काय म्हणाले?

आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवलं होतं. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. 

संबंधित बातमी:

Sanjay Gaikawad Amdar Niwas: आमदार निवासात संजय गायकवाडांना शिळं जेवण दिलं, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन डोक्यावर घेतलं