सांगली: सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत सुरु असलेला अंतर्गत संघर्ष अद्याप सुरुच आहे. काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्याऐवजी ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. या वादात आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उडी घेत विशाल पाटील यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या आहेत. आता लढाईला सुरुवात झाली आहे. आता मागे जाणे शक्य नाही. त्यामुळे आता मागेपुढे न बघता युतीधर्म पाळून हातात हात घालून काम करा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी विशाल पाटील (Vishal Patil) समर्थकांना दिला आहे. ते सोमवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.


आज राज्यातील 48 खासदारांपैकी महाविकास आघाडीचे 30-35 खासदार निवडून येतील, अशी परिस्थिती आहे. यामध्ये सांगलीच्या चंद्रहार पाटील यांचा समावेश असेल, हा विश्वास मला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद किती हा वेगळा विषय आहे. पण सर्वांनी समजुतदारपणा दाखवला पाहिजे. ही काही शेवटची निवडणूक नाही. पुढे विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी मविआचा धर्म पाळत हातात हात घालून काम केले पाहिजे. अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वांना विश्वासात घ्या. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. राजकारणात संयम लागतो. आपण सगळे ठामपणे एकत्र राहिलो तर भाजपला हरवणे शक्य आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.


आता मागे जाणे शक्य नाही, चंद्रहार पाटील हेच मविआचे उमेदवार: जयंत पाटील


सांगलीच्या उमेदवारीचा निर्णय घेतल्यानंतर आता ही चर्चा थांबली आहे. चंद्रहार पाटील हेच मविआचे उमेदवार आहेत. जिल्ह्यात एकास एक निवडणूक झाली तर विरोधी पक्षातल्या उमेदवारला हरवता येते. 48 जागांचे जागावाटप एका दिवसात  झाले नाही, त्यामुळे आता मागे जाऊन चर्चा करणे आता अवघड आहे. जुने चेहरे बघून बघून आता जनता कंटाळली आहे. त्यामुळे शिवसेनेने चंद्रहार पाटील हा नवीन उमेदवार दिलाय, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.


विशाल पाटील यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल


विशाल पाटील हे सांगली लोकसभेच्या रिंगणातून माघार घ्यायला तयार नाहीत, असे चित्र आजघडीला दिसत आहे. विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्या सकाळी विशाल पाटील काँग्रेस पक्षाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींमुळे सांगलीच्या राजकारणातील रंगत वाढली आहे.


आणखी वाचा


मोठी बातमी : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सांगली लोकसभा लढणारच!