सांगली : राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी (Election) 2 डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया संपन्न झाली असून उर्वरीत पुढे ढकलण्यात आलेल्या जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, 21 डिसेंबर रोजी सर्वच निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्राचे आणि सर्वच उमेदवारांचे, कार्यकर्त्यांचे लक्ष 21 डिसेंबरकडे लागले आहे. निकालाअगोदर ईव्हीएम स्ट्राँगरुम बाहेर कडा पहारा उमेदवारांकडून, राजकीय पक्षांकडून देण्यात येत आहे. तर, उमेदवारांची धाकधूकही वाढल्याचं दिसून येतं. मात्र, सांगली (Sangli) जिल्ह्यातील जतमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपच्या (BJP) नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या नावाने अघोरी, काळ्या जादूचा प्रकार केल्याचं पाहायला मिळल्याने खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

जत शहरातील निगडी रोड प्रभाग क्र 4 च्या रेणुका नगर येथील रस्त्यालगत एक हिरव्या रंगाचे कापड, एक मडके, दोन बाहुल्या, दोन लिंबू, हळद कंकू आणि गुलाल टाकल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, त्याच मडक्यामध्ये  हिरव्या शाईने भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.रवींद्र आरळी, महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार सुजय (नाना) शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे सलीम गवंडी यांची नावे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका अंतरावर दुसऱ्या एका हिरव्या कपड्यात आणखी एक मडके आढळून आले. त्या मडक्यामध्ये प्रभाग 4 मधील चार महिला नगरसेविका पदाच्या उमेदवारांची नावे आहेत. तर भाजपच्या नगरसेविकापदाच्या उमेदवाराचे नाव नसल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. 

मडक्यांमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराचे नाव नाही

जतमधील सदर घटनेमुळे परिसरासह शहरात  मोठी खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून 2 डिसेंबरला मतदान घेण्यात आले. मात्र, 3 डिसेंबर रोजीचा निकाल, 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. त्यातच, काळ्या जादूच्या प्रकारात, आढळून आलेल्या मडक्यांमध्ये शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे यांचे नाव नसल्याने शहरातील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, हे मडके कोणी ठेवले, ही काळी जादू कोणी ठेवली याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध