मुंबई: छावा सिनेमामुळे सध्या छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा (Aurangzeb) इतिहास पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच, संभाजी महाराजांची क्रूरतेनं हत्या केलेल्या औरंगजेबाची कबर देखील महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे असल्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी या कबरीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केल्यानंतर ही कबर महाराष्ट्रातून हटवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा प्रचंड गाजतोय आणि त्यामुळे अनेक वाद देखील निर्माण झालेले आहेत, पण या वादाची सुरुवात सर्वात आधी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh mhaske) यांनी लोकसभेत केली होती, त्यांनी केलेल्या मागणीमुळे संपूर्ण भारतात आज वेगवेगळ्या मुघल बादशहांच्या कबरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात यामुळे वातावरण चिघळते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अजूनही नरेश म्हस्के हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर, औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन दोन गट पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ही कबर हटवू नये, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे, या मुद्द्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.  

Continues below advertisement

औरंगजेबाची कबर ज्यांना ठेवायची असेल त्यांनी औरंगजेब हा त्यांचा देव आहे, हे मान्य करावे अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली. तसेच, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी जितू मियां आव्हाड, असे म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. क्रूरकर्मा औरंगजेबाचे सुरू असलेले उदात्तीकरण थांबवून तात्काळ त्याची कबर काढून टाकावी अन्यथा आम्ही ती उध्वस्त करू असा इशारा बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेनं दिला आहे. याबाबत पहिल्यांदा आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत जर याच्यावर कारवाई नाही झाली तर येत्या काळात आम्ही संभाजीनगरला जाऊन औरंगजेबाची कबर उध्वस्त करू, असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या परभणी शाखेने दिला आहे. त्यामुळे, औरंगजेबाची कबर हा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच वादग्रस्त बनत आहे. 

आव्हाडांचे अनेक सवाल

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हलवली नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली. यांना महाराष्ट्र जाळून टाकायचा आहे, त्यामुळे हे सर्व चालत आहे. रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का, अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का, हिटलरला बाजूला करून दुसरे विश्व युद्ध सांगता येईल का, असे प्रश्न आव्हाड यांनी विचारले आहेत. या सर्व गोष्टीला सरकारचा देखील एक छुपा पाठिंबा आहे, असा आरोप देखील त्यांनी महायुती सरकारवर केला आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या टीकेवर पलटवार करताना जितू मियाँ आव्हाड.. असे म्हणत खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केली.

Continues below advertisement

हेही वाचा

फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश