Dhananjay Munde Resignation : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा (Dhananjay Munde Resignation) का घेतला जात नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. यानंतर सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे याच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. यानंतर आज मंगळवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. आता यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. 

नेमकं काय म्हणाले सचिन खरात? 

सचिन खरात म्हणाले की, बीड येथील मास्सजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर या हत्तेचे फोटो समोर आले आहे. हे समोर आल्यानंतर सरकारने माननीय मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. परंतु, आम्ही मागणी करत आहोत की, फक्त राजीनामा नको. अजितदादांनी धनंजय मुंडेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकलपट्टी करावी. धनंजय मुंडे यांचे आरोपी मित्र आहेत. त्यामुळे या प्रकरणांमध्ये काय-काय झालं हे सगळं बाहेर येण्यासाठी धनंजय मुंडे यांना तात्काळ आरोपी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो राज्यपाल महोदयांकडे पाठवला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आलेला आहे. 

आणखी वाचा 

Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा