Rohit Pawar on Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. वादग्रस्त वक्तव्य तसेच विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळताना दिसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कृषिमंत्री यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे. सोमवारी माझी व त्यांची भेट होईल, तेव्हा ते बोलतील. त्यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असतानाच रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत शिंदे साहेब कधी दाखवणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
धुळ्यात कोकाटेंच्या दौऱ्यादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा
दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. माणिकराव कोकाटे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेल बाहेर सकाळपासूनच विरोधक जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करीत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्याम सनेर आणि माणिकराव कोकाटे यांचे समर्थक देखील आता हॉटेल बाहेर मोठ्या गर्दी करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे संपूर्ण हॉटेल परिसराला पोलीस छावणीच स्वरूप आलं आहे. तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ आलेल्या समर्थकांनी सांगितले की, विरोधक फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी स्टंटबाजी करीत आहेत.
आणखी वाचा