मुंबई : आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी रोहित पवारांना (Rohit Pawar) मित्रत्वाचा सल्ला देत असल्याचे सांगत भलीमोठी फेसबुक पोस्ट केली. त्यामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मैत्रीचा दाखला देत रोहित पवार यांनी केलेल्या आरोपावरुन त्यांच्यावर टीका केली होती. मोठा नेता होण्याची इतकी घाई चांगली नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. आता, सत्यजीत तांबे (Satyajeet tambe) यांच्या पोस्टवर रोहित पवारांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली.
सत्यजीत तांबे यांनी भाजपाच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चांगले संबंध होते, अशी सत्यजीत तांबे यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे, असं पत्रकारांनी सांगितलं. त्यावर रोहित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलं, मी काल पत्रकार परिषदेतून सत्तेत असणाऱ्या नेत्यांना प्रश्न केला आहे. तुम्ही कार्यकर्त्यांची नावं घेत आहात. त्यामुळे त्यांनी काही पोस्ट करुन वक्तव्य केलं, त्यावर मी उत्तर द्यावं, असं मला तरी वाटत नाही. मी मोठ्या नेत्यांना फॉलो करत असतो. सगळेच ट्विट करतात आणि ते मी वाचले पाहिजे आणि फॉलो केले पाहिजे असं मला वाटत नाही, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप कार्यकर्त्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वजण रोहित पवारांवर सडकून टीका करत आहेत. मात्र, या सगळ्यांच्या मांदियाळीत रोहित पवारांचे कान टोचणारे एका वेगळ्या नावाने सगळ्यांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर सर्जेराव म्हणत त्यांची पोस्टही चांगलीच व्हायरल झाली. राज्यातील उदयोन्मुख नेतृत्व अशी गणना होत असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी पोस्ट लिहून रोहित पवार यांना काही सल्ले दिले आहेत. घरातून काँग्रेसच्या राजकारणाचा दीर्घ वारसा असलेल्या मात्र मध्यंतरीच्या काळात भाजपच्या जवळ गेलेल्या सत्यजीत तांबे यांची ही पोस्ट टीकेची धनी ठरली. कारण, काही तासांतच सत्यजीत तांबे यांनी आपल्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले सत्यजीत तांबे
आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं. अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही.
हेही वाचा
