Rohit Pawar in Majha Maharashtra Majha Vision : मुघल शासक औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. ही कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याची तयारीही केली होती. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटलं. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला (BJP) खोचक टोला लगावला आहे.
एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या विशेष कार्यक्रमात रोहित पवारांनी औरंगजेबच्या कबरीच्या वादावर भाष्य केलंय. ते म्हणाले की, सरकारकडे बहुमत असलं तरी तीन पक्ष आहे. सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री बोलत होते आणि मुख्यमंत्र्यांकडे हातवारे करत होते. ते बोलत असताना विधान परिषदेत नोटींग केले जाते त्यात ते रजिस्टर होते. हे एक प्रकारचं राजकारण आहे. बाहेर वेगळ्या प्रकारचे राजकारण केले जाते. आता कदाचित एका मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले जाते. यातून आमदाराने, नेत्यांना संदेश जातोय की तुमच्याच नेत्याचा मी ऐकत नाही. जर काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे या. मी तुमचं काम करतो. पहिल्या बजेटमध्ये सरकारबाबत लोक नकरात्मक झाले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडले
रोहित पवार पुढे म्हणाले की, एखाद्या मुद्द्यावर वेगळ्या दिशेने लोकांचं लक्ष न्यायचं असेल तर औरंगजेबचा मुद्दा आणण्यात आला, तो फ्लॉप झाला. लोक आता ते स्वीकारायला तयार नाहीत. त्यांची मेन बॉडी आरएसएसने सुद्धा भाजपला वाऱ्यावर सोडले आहे. मग आता दुसरा मुद्दा कोणता आणायचा तर दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित केला. माझं असं मत आहे की, लोकांच्या हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला आज अडचणीत आहेत. त्यांच्याबद्दल आज बोलले जात नाही, चर्चा केली जात नाही. कशावर चर्चा केली जाते तर एक थडगं? तो विषय आज संबंधित नाही, असे त्यांनी म्हटले.
सरकारला सुद्धा जमिनीवर आणावं लागेल
मला कधी कधी वाटते की, आम्ही चुकतो. सत्ताधारी आम्हाला त्यांच्या पिचवर आणायला बघतात आणि आम्ही त्यांच्या पिचवर जातो. त्यांनी औरंगजेबचा मुद्दा काढला आणि आम्ही त्याला काउंटर करत बसलो. आम्ही सुद्धा काही प्रमाणात रणनीती बदलली पाहिजे आणि कुठेतरी सरकारला सुद्धा जमिनीवर आणावं लागेल की मुद्द्याचा बोला. आज मुद्द्याचा बोललो नाही तर महाराष्ट्र असाच मागे जात राहील. आम्ही जेव्हा गुजरात बद्दल बोलतो, तेव्हा सत्ताधारी म्हणतात तुम्ही गुजरातची पब्लिसिटी करत आहात. गुजरात गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या फार पुढे गेला आहे आणि आपण फार मागे राहिलेलो आहोत. गुजरातची लोकसंख्या सात कोटी आहे. आपली लोकसंख्या 12 कोटी आहे. मात्र आपलं उत्पन्न घटत चालले आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा