Ahmednagar News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. एकीकडे भाजपकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. मात्र "जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं, तेव्हा हे लोक शांत का बसले?" असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केला आहे. सोबतच "हरहर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटात इतिहासात बदल करण्यात आला तेव्हा यांनी तोंड उघडलं नाही, हे कितपत योग्य आहे,?" असं रोहित पवार यांनी म्हटलं.


'पुस्तकात काय, पत्रात काय हे समोर यायला हवं'
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक वाद निर्माण झाले. त्यामुळे भारत जोडो यात्रेवरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न होतोय का? यावर रोहित पवार यांनी होकारार्थी उत्तर दिलं. सत्तेतील लोकांचा भारत जोडो यात्रेवरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. राजकीय विषय मला घ्यायचा नाही, पण खरा इतिहास काय हा समोर आला पाहिजे. पुस्तकात काय आहे, पत्रात काय आहे हे समोर यायला हवं असं रोहित पवार म्हणाले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावकारांच्या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो असं वक्तव्य केलं, त्यावर बोलण्यास मात्र रोहित पवार यांनी टाळलं. 


'आदिनाथ साखर कारखाना सुरु होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्नशील'
करमाळा येथील आदिनाथ साखर कारखाना सुरु व्हावा ही करमाळ्यासह कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे, माझीही इच्छा आहे. पण यात आमचे विरोधक खोडा घालत आहेत. भाजप आमदार राम शिंदे हे बारामती अॅग्रो सुरु होऊ नये म्हणून प्रयत्न करतात, त्यांनी ज्या मंत्र्यांना फराळ खायला बोलावलं त्या मंत्र्यांनी तर एफआरपी सुद्धा दिली नाही, असं म्हणत रोहित पवारांनी तानाजी सावंत यांना टोला लगावला. सोबतच हे सर्व शेतकरी आणि जनता पाहत आहे असंही रोहित पवार म्हणाले.


'ऊस उत्पादकांचे प्रश्न तातडीने सोडवले जातील'
जामखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस नोंदी, ऊस तोड, कारखाना टोळ्या, ऊस वाहतूक, यासारख्या विविध ऊस प्रश्नासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी जामखेडच्या हळगाव कारखान्यावर बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून हे प्रश्न तातडीने सोडवण्यात येईल असं रोहित पवार म्हणाले.