Ravindra Dhangekar: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहार प्रकरणावरुन शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपकडून धीरज घाटे (Dhiraj Ghate) आणि गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) लक्ष्य केले. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी लक्ष्मी रोडवरील 17,300 चौरस फुटांची वक्फ बोर्डाची जमीन हडपली, असा आरोप गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी केला. यामुळेच धंगेकरांनी काँग्रेस सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला, असेही त्यांनी म्हटले होते. तर धीरज घाटे यांनी, धंगेकर केवळ चमकोगिरी करण्यासाठी भाजपच्या नेत्यांना बदनाम करत असल्याचा आरोप केला होता. या टीकेला रविवारी रवींद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले.
माझा फोकस केवळ मुरलीधर मोहळ आणि जैन मंदिरावर आहे. वक्फ बोर्डाच्या जागेचा विषय काही नवीन नाही, तो विषय जुना आहे. वक्फ बोर्डाच्या जागेवर राग कोणाला आला तर धर्मवीर धीरज घाटेंना राग आला. अल्पसंख्यांकांचा विषयावर राग धर्मवीर धीरज घाटेंना आला. कमला नेहरुमधून दत्तक घेतलेल पोरगं काय बोलतोय, यावर मी काही बोलणार नाही. बालसंगोपनातून दत्तक घेतलेल्या पोरावर मला बोलायला लावू नका. त्याचा इतिहास काय आहे, मला माहिती आहे, अशी तिखट टीका धंगेकर यांनी केली.
जे लाभार्थी आहेत, ज्यांना तिकीट हवं, ज्यांना टेंडर हवं आहे, अशा लोकांना मुरलीधर मोहोळ हवा आहे. जी चांगली लोक आहेत त्यांना मुरलीधर मोहोळ लागत नाही. माझा मुरलीधर मोहोळ यांना नाही, तर विकृतीला विरोध आहे. ही सुरुवात आहे अजून गोखलेंचे प्रताप समोर येणार आहेत, असेही धंगेकर यांनी सांगितले.
Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळांना जैन बांधवांनी हाकलून दिलं, धंगेकरांचं टीकास्त्र
मी फक्त जैन मंदिराबाबत बोलणार आहे. जोपर्यंत जैन मंदिराची सुटका होत नाही ज्यांनी सपोर्ट केला आहे ते मुरलीधर मोहोळ यांच्यावर मी बोलणार आहे. काल मुरलीधर मोहोळ तिथे गेले त्यांना लोकांनी हाकलून दिले. 18 दिवसात मुरलीधर मोहोळ बोलले असते तर लोकांनी हाकलून देण्यापर्यंत वेळ आली असती का? , असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला.
मुरलीधर मोहोळ यांना आता थोडीतरी लाज वाटत असेल तर सोमवारपर्यंत गोखले बिल्डर्सशी बोलून हा गैरव्यवहार रद्द करावा. मला विकृतीवर बोलावंच लागेल, अन्यथा पुढची पिढी माफ करणार नाही. आज जैन समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. उद्यापासून मी धरणे आंदोलनाला बसणार आहे, असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला.
Ravindra Dhangekar: मी चिंतन-बिंतन करत नाही, मी क्षत्रिय आहे, मी लढणार: रवींद्र धंगेकर
यावेळी रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्राबाबतही भाष्य केले. मोदींच्या नावाने मुरलीधर मोहोळ निवडून आले असतील तर आपण मोदींना जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली पाहिजे. मी त्या पत्रात जमीन विक्रीचा सगळा घटनाक्रम लिहला आहे. नेते काय एवढे भोळे नाहीत, त्यांना जरी वाटत असेल मी वेडा आहे, ते भोळे आहेत, पण कोणी भोळे नाही. मोदीसाहेब काम करतात. लोकांनी त्यांना पुन्हा पुन्हा पंतप्रधान केले आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसंनी काम केले आहे. हे दोघेजण सक्षमपणे निर्णय घेतील आणि जैन समाजाला न्याय देतील, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले. दरम्यान, या प्रकरणात मोहोळांवर टीकेची झोड उठवणाऱ्या राजू शेट्टी यांनी आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. ते आज पुन्हा एकदा जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री प्रकरणाचा आढावा घेणार आहेत. याविषयी बोलताना धंगेकर यांनी म्हटले की, मी चिंतन बिंतन करत नाही. मी क्षत्रिय आहे, मी लढणार आहे.