Ratnagiri News : विधानसभा निवडणुकांना तसा अद्याप अवधी आहे. पण सध्या राज्यातलं राजकारण पाहता प्रत्येक मतदारसंघानुसार आता सर्व शक्यतांची पडताळणी प्रत्येक पक्ष सध्या करताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातल्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात राजन साळवी (Rajan Salvi) उभे राहिल्यास उदय सामंत यांच्यासमोर तगडं आव्हान उभं राहू शकते. त्यामुळे राजन साळवी यांना रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांच्याविरोधात उमेदवारी तर दिली जाऊ शकत नाही ना? अशी चर्चा दबक्या आवजात सध्या सुरु झालेली आहे. शिवाय विविध प्रकारच्या चर्चा आणि शक्यतांची चाचपणी देखील सध्या केली जात असल्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरु झालेली आहे.
राजन साळवी हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. शिवसेनेच्या बांधणीसाठी राजन साळवी यांनी घेतलेली मेहनत, कार्यकर्त्यांची असलेली फौज आणि दांडगा जनसंपर्क या राजन साळवी यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे राजन साळवी हे उदय सामंत यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करु शकतात, असं मानणारा देखील एक मोठा वर्ग आहे. त्याचमुळे सध्या विविध चर्चा रंगताना दिसून येत आहेत.
लांजा-राजापूर मतदारसंघात साळवींविरोधात नाराजी
लांजा राजापूर मतदारसंघात सध्या शिवसेनेतल्या अंतर्गत घडामोडी देखील वेगाने घडत आहेत. नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस लक्ष केंद्रित करत आहे का? अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. शिवाय राजन साळवी यांच्याविरोधात नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन काही प्रमाणात नाराजी देखील दिसून येत आहे. या साऱ्याचा विचार केल्यास लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून साळवी यांना निवडणूक जड जाऊ शकते. या साऱ्यांमध्ये काँग्रेसचे 2019 मधील उमेदवार अविनाश लाड देखील सध्या या ठिकाणी सक्रिय झालेले दिसून येत आहेत. या साऱ्या शक्यतांचा, राजकीय गणिताचा विचार केल्यास शिवाय राजन साळवे यांची रत्नागिरी येथील ताकद पाहिल्यास साळवी सामंतांसमोर तगडा आव्हान उभं करु शकतात. त्यामुळे सध्या ठाकरे गट उदय सामंत यांच्यासमोर साळवी यांचं आव्हान उभे करण्याच्या प्रयत्नत असल्याची चर्चा सुरु झालेली आहे.
बंडखोरीनंतर कोकणाती बहुतांश आमदार शिंदे गटात
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे तब्बल 40 आमदार फुटले. यात कोकणातील आमदारांची संख्या मोठी होती. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जोता. परंतु बहुतांश आमदार शिंदे गटात गेले. त्यात उदय सामंत यांचाही समावेश आहे. बंड झालं त्यावेळी राजन साळवी देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत.