मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचा मेळावा पुढील आठवड्यात फलटण येथे होणार आहे. त्यापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही भेट होणार असल्याची शक्यता आहे. या भेटीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या भावना अजित पवारांसमोर मांडल्या जाणार असल्याची माहिती आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांचा पुढील आठवड्यात मेळावा
विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी महायुतीत होणारा अन्याय आणि त्रासाचा दाखला देत तुतारी हाती घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. कार्यकर्ते महत्वाचे असून ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
रामराजे नाईक निंबाळकर येत्या दोन तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना भेटणार आहेत. या भेटीत कार्यकर्त्यांच्या भावना अजित पवार यांच्या समोर मांडण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात फलटण मध्ये कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन आपली पुढील दिशा रामराजे जाहीर करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी अजित पवारांसोबत सत्तेत जाताना जी आश्वासन देण्यात आली होती ती पूर्ण
न झाल्यामुळे रामराजे वेगळा निर्णय घेण्याची दाट शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आज उपमुख्यंत्री अजित पवार सातारा दौऱ्यावर आहेत. मकरंद पाटील आमदार असलेल्या वाई मतदारसंघात जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आहे. या दौऱ्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. रामराजे नाईक निंबाळकर सध्या वैयक्तिक कारणास्तव मुंबईला येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अजित पवारांकडून दीपक चव्हाणांची उमेदवारी फोनवरुन जाहीर करण्यात आली होती. दीपक चव्हाण फलटण मतदारसंघातून तीनवेळा आमदार झालेले आहेत. आता ते चौथ्यावेळी विधानसभेच्या रिंगणात असतील. फलटण मतदारसंघात यावेळी ते विजयी झाल्यास सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद होईल. कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेगळा निर्णय घेतल्यास सातारा जिल्ह्याचं राजकारण बदलणार आहे.
इतर बातम्या :