मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये (Mahayuti) मोठी बंडखोरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडे जाणाऱ्यांचा कल वाढला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचं लक्षात येताच, अनेक इच्छुक तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी (Sharad pawar) केलेल्या फोनच्या उल्लेखानंतर आता रामराजेंचंही ठरलं आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी ज्यांची उमेदवारी जाहीर केली होती, ते दीपक चव्हाण हेदेखील तुतारी हाती घेणार आहेत. त्यामुळे, अजित पवारांनी उमेवारी जाहीर केलेल्या विद्यमान आमदारानेही त्यांना गुलीगत धोका दिल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे इंदापूरमधील कार्यक्रमातून शरद पवारांनी फलटणमधील 14 तारखेच्या मेळाव्याची माहिती देत रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतरही रामराजे आणि अजित पवार (Ajit pawar) यांच्या भेटीत काय ठरतं, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर, रामराजेंचाही तुतारी हाती घेण्याचा निर्णय झाल्याची खात्रीशीर माहिती आहे.  


राजराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत सातारा अजित पवार यांचे सातारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्यासोबत असलेले फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील तुतारी हातात घेणार आहेत. 14 तारखेला फलटण मध्ये जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडणार आहे. महायुतीत आल्यानंतर देण्यात आलेली आश्वासनं पाळली न गेल्याने अजित पवार यांची निंबाळकर कुटुंबीयांकडून साथ सोडली जात असल्याची सुत्रांची माहिती आहे. 


अजित पवारांना शोधावा लागणार नवा उमेदवार


रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी महायुतीत होणारा अन्याय आणि त्रासाचा दाखला देत तुतारी हाती घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. मात्र, आता या सर्वांचाच निर्णय पक्का झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांना आता फलटण विधानसभेसाठी नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे. कारण मागील आठवड्यातच अजित पवारांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, रामराजेंसह दीपक चव्हाण यांनीही अजित पवारांना गुलीगत धोका दिलाय. आता, दीपक चव्हाण यांनी देखील अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती आहे. 


रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील निर्णय फलटणला मेळावा घेऊन घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापूर्वी फलटणमध्ये कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भातील गोष्टी अजित पवारांना सांगणार असल्याचं म्हटलं  होतं. विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर लवकरच अजित पवारांची भेटही घेणार आहेत. मात्र, या भेटीपूर्वीच त्यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचं निश्चित झाल्याचं समजतं. त्यामुळेच, 14 ऑक्टोबरला फलटणला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून याच मेळाव्यात ते तुतारी हाती घेणार आहेत. 


शरद पवारांना फलटणमधून फोन


इंदापूरच्या कार्यक्रमाला निघण्यापूर्वीच मला कुठूनतरी फोन आला. म्हणाले 14 तारखेला आमच्याकडे यावेच लागतंय. मी म्हणालो काय कार्यक्रम आहे, ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच आमच्याकडे आहे. मी म्हटलं कुठं, ते म्हणाले फलटणला... असे म्हणत शरद पवारांनी फलटणमधील रामराजे निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश कार्यक्रमाचे संकेतच इंदापुरातील कार्यक्रमातून दिले होते. तसेच, आता, याच्यानंतर फलटण, आणि फलटणनंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस बुक झाले आहेत, अशा शब्दात त्यांनी पक्षाकडे येणाऱ्या इच्छुकांची व उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचे स्पष्ट केले होते.


हेही वाचा


मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात