मुंबई - दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत आज (बुधवारी) विधानसभेमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप करण्यात आले. दिशा सालियनसह सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही तेच घडले असेल. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलिसांना चौकशी करण्यास विरोध केला गेला. त्या काळात दररोज शिवसेना उबाठा गटाचे नेते रिया चक्रवर्तीच्या बाजूने बोलत होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारने पुरावे नष्ट केले का? याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी विधानसभेत केली आहे.
पुरावे नष्ट करायचे होते का?
विधानसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणी बोलताना भाजपा आमदार राम कदम म्हणाले, ज्यावेळी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला, तो कोविड काळ होता. सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या बाजूने काही नेते बोलत होते. सुशांत सिंह राजपूतचा ज्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला, तो चौकशीसाठी ताब्यात ठेवला पाहिजे होता. मात्र, तो फ्लॅट घाईघाईने उद्धव ठाकरे सरकारने मूळ मालकाला परत केला. त्या फ्लॅटमध्ये 68 दिवसांत सर्व फर्निचर काढले गेले. रंगरंगोटी केली. पुरावे नष्ट करायचे होते का? रिया चक्रवर्तीच्या बाजूने ठाकरे गटाचे नेते बोलत होते. पहिल्या दिवसापासून यांच्या मनात खोट नव्हती मग हे प्रकरण सीबीआयला का दिले नाही. बिहारचे पोलीस चौकशीला येतात, त्यांना तपास करण्यास का अडवले? 68 दिवसानंतर सीबीआयला चौकशीसाठी हे प्रकरण दिले गेले, तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट केले होते का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
ठाकरेंना कोणाला वाचवायचं होतं?
पुढे बोलताना राम कदम म्हणाले, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारची काय भूमिका याची चौकशी झाली पाहिजे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ते प्रकरण सीबीआयकडे दिलं नाही. ठाकरेंना कोणाला वाचवायचं होतं. 68 दिवसात सुशांतचा मृत्यू झालेल्या घरात पेंट मारला, साहित्य दिलं. त्यानंतर घर मूळ मालकाकडे परत केलं गेलं. घाई गडबडीत सुशांतच प्रकरण सीबीआयकडे दिलं नाही. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट सादर केला, कारण सर्व पुरावे नष्ट केल्यानंतर प्रकरण दिलं गेलं. या प्रकरणी नवी एसआयटी (SIT) स्थापन करा. ठाकरे गटाचे नेते उभे राहून चौकशी करू नका म्हणत होते. मी बोलायला लागलो की वेलमध्ये उतरले. यात बड्या नेत्याचा हात असल्याने हे विरोध करत होते. दिशा सालियान प्रकरणातील एसआयटी (SIT) सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही चौकशी करेल असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.