Rajya Sabha Elections 2024: नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) बुधवारी (13 फेब्रुवारी) राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल (Rajya Sabha) करणार आहेत. यापूर्वी ही ऑफर प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना देण्यात आली होती, मात्र त्यांनी राज्यसभा निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान, सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेली (Raebareli) मतदारसंघातील लोकसभेच्या खासदार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करू शकतात. त्याचबरोबर काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती मिळत आहे.
इंडिया आघाडीच्या जागावाटपासंदर्भातील बैठकीत निर्णय : सूत्र
सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या जागा वाटपाबाबत इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली होती. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना राज्यसभेतून सभागृहात पाठवावं, अशी चर्चा झाली. मात्र, या बैठकीत प्रियंका गांधींनी राज्यसभेची ऑफर नाकारली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, सोनिया गांधी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायबरेलीमधून प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.
सोनिया गांधींचा लोकसभा निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार
यापूर्वी सोनिया गांधी यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीच सांगितलं होतं की, ही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक असणार आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी 1999 पासून लोकसभेच्या सदस्य आहेत. यंदा पहिल्यांदाच त्या राज्यसभेवर जाणार आहेत.
रायबरेलीवर 66 वर्षांपासून काँग्रेसचंच वर्चस्व
सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेलीची जागा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. गेली अनेक दशकं या जागेवर काँग्रेसचंच वर्चस्व आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. येथील प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता ही जागा प्रत्येक वेळी काँग्रेसकडे आहे. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडेच आहे.
दरम्यान, एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक लढणं आणि त्यासाठी प्रचार करणं प्रकृती अस्वास्थामुळे सोनिया गांधींना शक्य नसल्याचं बोललं जात आहे. सोनिया गांधींच्या लोकसभा निवडणूक लढवण्यावरुन सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, सोनिया गांधी जर राज्यसभेवर जाणार असतील, तर त्यांचा मतदारसंघ उत्तर प्रदेश रायबरेलीमधून लोकसभेसाठी काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागू शकते? यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. जर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार नाहीत, तर तिथून कोण निवडणूक लढवणार? तिथून त्यांची मुलगी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा गांधी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.