Rajendra Raut on Rohit Pawar, बार्शी : सोलापुरातील बार्शी (Barshi) तालुक्यात आज 'शरद शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. रोहित पवारांच्या टीकेनंतर आता राजेंद्र राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 


राजेंद्र राऊत काय म्हणाले ?


राजेंद्र राऊत म्हणाले, फक्त बारामतीचा विकास होणे म्हणजे संपूर्ण राज्याचा आणि देशाचा विकास झाला असं समजू नका. बारामतीचा पण करा. परंतु इतर तालुके कोणी दुष्काळी ठेवले हे रोहित पवारांनी त्यांच्या आजोबांना विचारलं असतं तर बर झालं असतं. माझ्यावर टीका करताना जमिनीचा विषय काढला. माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय काढला. मराठी माणसाने व्यवसाय करणे हा गुन्हा नाही. आम्ही प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो. 


पुढे बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले, रोहित पवार तुमची प्रॉपर्टी कशी वाढली ते आम्हाला सर्व माहिती आहे. तुमची लायकीचं काय आहे? तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे आहात. इथं येऊन दुसऱ्यांच्या नावाने ओरडत आहात. या बार्शीत कोणाची गुंडगिरी होती आणि कोणी संपवली हे सर्वांना माहिती आहे. रोहित पवार तुम्ही पुण्यामध्ये जमिनी हडप केल्या. कोणत्या बँकांना टोप्या घातल्या, तुमचे कारखाने कसे उभे राहिले. तुम्ही काय दिवे लावले हे सर्व आम्हाला माहिती आहे. माझा नाद करु नका, ज्यांनी माझा नाद केला. त्यांना मी गारेगारचे गाडे लाऊन दिले आहेत. तुम्हीपण गारेगारचा गाडा लावचाल. माझा नाद करु नका, मी खंबीर आहे. 


रोहित पवार काय काय म्हणाले होते? 


रोहित पवार म्हणाले, कोणी एखादा अपक्ष उभा राहिला आणि भाजपला पाठिंबा दिला असला तरी तो बीजेपीचाच माणूस आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बार्शीत दडपशाही खूप आहे, असं आम्हाला समजलंय. युवकांनी केजीएफ हा सिनेमा पाहिला असेल. त्या केजीएफमध्ये एक मोठं शहर असतं, त्या शहराला मोठी भिंत असते. तिथे जो गुंड असतो, त्या गुंडाला असं वाटतं की, दुकान माझंच असावं. धंदा माझाच व्हावा. जमीन मीच घ्यावी.  विकासाचा निधी या परिसरात आणतो, वाळू माझीच असावी. खडी माझीच असावी. काँट्रॅक्टर माझा भाऊच असावा. काही व्यापाऱ्यांना मी भेटलो त्यांनी सांगितलं. पहिलं मार्केट कोण उघडतं तर इथले लोक नेते उघडतात. त्यानंतर दुसऱ्यांनी मार्केट उघडायचं. 


दोन महिन्यांत येथे महाविकास आघाडीचं सरकार येणार 


पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले,  हीच संधी आहे, या संधीचं सोन करा. महाविकास आघाडीच्या पाठीशी राहा. आपल्यावर खोट्या केसेस टाकल्या जातील, तुम्ही पोलिसांना घाबरणार का? पवार साहेब आमचे नेते आहेत, दोन महिन्यांत येथे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीचं ऐकून सामान्य कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकल्या तर दोन महिन्यानंतर गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


शौचालयाच्या दारातच नितेश राणेंच्या पुतळ्याचं दहन, जरांगेंवरील टीकेमुळे लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक