Rajabhau Waje on Operation Tiger : शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची (Shivena Opration Tiger) चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाआधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तर या बातमीला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील दुजोरा दिला होता. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही अफवा असून शिंदे गटावर जोरदार तोफ डागली. यानंतर नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी देखील हे वृत्त फेटाळले आहे.
राजाभाऊ वाजे म्हणाले की, असा कुठलाही संपर्क माझ्याशी झालेला नाही. आमच्यामध्ये अशी चर्चा देखील झालेली नाही. कालच पक्षाच्या संसदीय कार्यालयाचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. सर्वच खासदार त्यासाठी हजर होते. आमच्यात खेळीमेळीची चर्चा झाली. पक्षाचे काम अधिवेशनात कसं करायचं? पक्षाची बाजू कशी मांडायची? याबाबत आमची चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मी फाटका माणूस
ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून अनेकदा पक्षप्रवेश असल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्यासोबत देखील असेच घडत आहे का? असे विचारले असता माझ्या बाबतीत असे व्हायचे काहीच कारण नाही. माझ्याकडे काहीच नाही. मी फाटका माणूस आहे. माझ्याकडे ईडी, सीबीआय कशासाठी येतील? आले तरी त्यांना काय सापडणार आहे? असे राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे.
हे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, अशा चर्चा वारंवार रंगताना पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता राजाभाऊ वाजे म्हणाले की, मला तेच समजत नाही की हे का होत आहे? कारण राज्यात मोठ्या प्रमाणात युतीसोबत आमदार आहेत. राज्य सरकार स्थिर आहे. केंद्रातही सरकार स्थिर आहे. तरी अशी चर्चा होते हे मला न समजण्यासारखी गोष्ट आहे. हे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या