Continues below advertisement

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कलाप्रेमी असून कलाकारांवरही तितकंच प्रेम करतात. हिंदी असो वा मराठी सिनेकलाकारांची आणि त्यांची मैत्री नेहमीच चर्चेत असते. सध्या मराठी सिनेसृष्टीत दशावतार (Dashavatar) ह्या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा (Cinema) कोकणातील कथेवर भाष्य करतो. सुबोध खानोलकर दिग्दर्शित जोरदार चर्चेत असलेला हा 'दशावतार' चित्रपट आज राज ठाकरेंनी वेळात वेळ काढून पाहिला. विशेष म्हणजे राज यांनी सिनेमा पाहिल्यानंतर आपला अभिप्राय देखील नोंदविला आहे. दशावतार सिनेमातून महाराष्ट्रातील, कोंकणातील जमीनींचा प्रश्न अधोरेखित केला गेला आहे. या सिनेमाने गंभीर प्रश्नाला हात घातल्याचंही राज यांनी म्हटलं.

दशावतार सिनेमातून गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे, मी गेली अनेक वर्ष माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सांगत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. जमीन हे आपले अस्तित्व आहे, अनेक ठिकाणांच्या जमिनींचा हा विषय आहे. महाराष्ट्रातील अनेक जमिनींचा हा विषय आहे, फक्त कोंकणातील जमिनींचा नाही, असे म्हणत दशावतार सिनेमातून मांडलेल्या भूमिकेचं राज ठाकरेंनी स्वागत केलं आहे.

Continues below advertisement

महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषय

सुबोधने हा विषय अत्यंत चलाखीने मांडला आहे, दशावताराच्या रुपात ते मांडले असून अत्यंत उत्कृष्ट छायाचित्र, संगीत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी अत्यंत चांगले काम केले आहे, मला वाटतं हे अत्यंत छोटे वाक्य आहे. कारण, ते खूप मोठे आहेत आणि त्यांनी उत्तम काम केले आहे, असे म्हणत दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेचंही राज यांनी कौतुक केलं. बाकीच्या कलाकारांनी, महेश मांजरेकर यांनीही साजेशे काम केले, प्रियदर्शनी यांनीही चांगल काम केलं. एकंदरीत हा चित्रपट एंटरटेनमेंट आहे, पण महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषयाला त्यांनी हात घातला आहे, त्यामुळे नक्की हा सिनेमा पाहायला हवा, असेही राज यांनी म्हटले.

पहिल्या 3 दिवसांत 5 कोटी 22 लाखांचा गल्ला

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या झी स्टुडियोज प्रस्तुत 'दशावतार’ प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळली आहे. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल 5 कोटी 22 लाख रुपयांचा गल्ला जमवला असून तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. 

हेही वाचा

दशावतारचा धमाका, वीकेंडला छप्परफाड कमाई, शो हाऊसफुल्ल, कमाईचा आकडा किती?