Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे बंधूंनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन देखील केले होते. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिंदी भाषेबाबतचा जीआर रद्द करण्याची घोषणा केली.
राज्य सरकाराच्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे. दोन भाऊ एकत्र येऊ नये, म्हणून किती प्रयत्न करणार, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 5 जुलैला एकजूट दिसणार होती. हिंदीच्या सक्तीसमोर आमची शक्ती मोठी दिसली. नागरिक देखील सोशल मीडियावर व्यक्त होत आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधात मराठी माणसाने एकजूट दाखवली. त्याच्या दबावामुळेच सरकारने हिंदी भाषेचा जीआर रद्द केला. मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली. हा मराठी एकजुटीचा विजय असून, 5 जुलै रोजी होणार विरोधाचा मोर्चा आता विजयी मोर्चा निघेल, असे उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्री येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. मराठी माणूस एकत्र न येण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. पण, मराठी माणसांच्या एकजुटीची शक्ती पाहून सरकारने माघार घेतली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र विजयी जल्लोष करणार?
पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे, म्हणजेच त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर, 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र विजयी मोर्चा आणि जल्लोष करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैला विजयी मोर्चा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांबरोबरच मनसे, अन्य पक्ष आणि इतर संस्थांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात 5 जुलैच्या सभेत सामील व्हायचे की नाही, याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.