Raj Thackeray Pune Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे शहर, राम मंदिर, मशिदीतून निघणारे फतवे अशा अनेक मुद्यांवर भाष्य केलं. पुण्यातील भाषणात राज ठाकरे काय काय म्हणाले? राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे जाणून घेऊयात...


मुंबई शहराची वाट लागायला काळ गेला. पुणे शहराची वाट लागायला वेळ लागणार नाही. एक मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे झाला आणि हे शहर वेड्यासारखं पसरायला लागलं. काहीच नियोजन नाही. मला वाटलं आज फ्लायओव्हर करावा, उद्या वाटलं तोडावा, असं सुरु आहे. पुणे शहराची लोकसंख्या आहे 70 लाख. 5 ते 10 वर्षांपूर्वी मी ऐकलं होत की, लोकसंख्या 30 ते 32 लाख आहेत. या शहरात वाहने आहेत, 72 लाख आहेत. आपल्याला रस्ते कसे पुरतील, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. सार्वजनिक बसेसची व्यवस्था असते. आता मेट्रो सुरु झालीये. मी म्हटलं एक सुरु करुन बघा , पुणेकर जातात का? टू व्हीलर घेतली मारली कीक चालला, अशी पुणेकरांची अवस्था आहे. कोण जीना चढेल, कोण मेट्रो पकडले, त्यापेक्षा गाडीवरुन जाऊन येतो. या मानसिकतेमुळे आपल्याला रस्ते मिळणार नाही. पुणे शहरात साडेसात ते आठ टक्के रस्ते आहेत. गेल्या 10 वर्षात पुण्यात 30 लाख लोक बाहेरचे आले. शिक्षणासाठी आले. उद्योगधंद्यासाठी आले. या शहरात अनेक विद्यापीठ आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. 


ही पहिली निवडणूक, ज्याला कोणताही विषय नाही 


ही 18 व्या लोकसभेची निवडणूक आहे. मी मध्यंतरी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये मी सांगितलं होतं की, 1975 चा काळ होता. तेव्हा आणिबाणी लादली गेली होती. तेव्हा संपूर्ण देश घुसळून गेला होता. त्यानंतर 1977 साली निवडणूक झाली. 1952 नंतरच्या सगळ्या निवडणूका पाहात होतो. 1971 च्या निवडणुकीत गरिबी हटावचा नारा होता.1977 च्या निवडणुकीत आणिबाणीची लाट होती. 1980 ला जनता पक्ष आतल्या आत पराभवी ठरावा लागला. त्यानंतर इंदिरा गांधींची लाट सुरु होती. 1984 इंदिरा गांधींची हत्या झाली हा विषय होता. 1989 च्या निवडणुकीत बोफोर्सचा मुद्दा होता. 1991 साली राजीव गांधींची हत्या झाली. 1996 च्या निवडणुकीत बाबरी मशीदीचा विषय होता. 1998 ला कांद्याचा विषय होता. कांदा महागला होता. 1999 ला विदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि पुन्हा सोबत गेले. 2004 इंडिया शायनिंग आलं. 2014 ला मोदींची लाट आली. 2019 चा पुलवामाचा मुद्दा होता. ही पहिली निवडणूक बघतोय, ज्याला विषयचं नाही. त्यामुळे प्रत्येकजण आई-बहिण काढतोय, असं राज ठाकरे यांनी सांगितले. 


हा महाराष्ट्र असा  नव्हता


महाराष्ट्र हा कधी असा नव्हता. काही जणांची भाषणं पाहिली. या सर्व गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात. भाषणांमधून शिव्या देणारा महाराष्ट्र कधी नव्हता. या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये गुंतवून ठेवलय. आज तरुण तरुणी त्यांच्या भविष्याचा विचार करत आहेत. त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करत आहेत.


म्हणून मी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेण्यास आलो आहे


 मी आजची सभा का घेतोय सांगतो.  पुण्यासारख्या शहराने अनेक विद्वान दिले. जगभरातील कंपन्यांना सल्लागार दिले. अशा पुणे शहरामध्ये तुम्हाला पुन्हा सत्तेत बसणाऱ्या पक्षाचा उमेदवार मिळाला आहे, म्हणून मी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेण्यास आलो आहे. मला चार गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. आपण कोणाला तरी विमानतळावर सोडायला जातो. त्याला सांगतो की, बाहेरचं काही खाऊ नको. विमानातून बाहेर काढू नको, असं पण सांगतात. 


सभोवतालचं वातावरण त्याना आनंदी ठेवतं नाही


आपल्या नियोजनशून्य गोष्टींमुळे आपली शहरं डोळ्यादेखत बरबाद होत आहेत. लोक प्रतिनिधी म्हणून ही लोक शहरं वाचवणार नसतील. मी एक डॉक्युमेंट्री केली होती. मी म्हटलं आपल्या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. तुमच्या टॅलेंटप्रमाणे नोकऱ्या आहेत. तरिही आपल्या देशातील मुलं शिक्षणासाठी बाहेरच्या देशात कशामुळे जात आहेत. शिक्षण तर आपल्या देशातही मिळतं, नोकऱ्याही आपल्या देशात मिळतात. पगार कमी जास्त असेल पण का जातात? कारण सभोवतालचं वातावरण त्याना आनंदी ठेवतं  नाही. म्हणून त्यांच्या मनात विचार येतो देश सोडून बाहेर गेलं पाहिजे. आपल्या आमदार , खासदारांची ही जबाबदारी आहे की, आपलं वातावरण चांगलं ठेवायला पाहिजे. 


राम मंदिराबाबत काय म्हणाले ठाकरे?


जेव्हा ते राम मंदिर झालं, तेव्हा कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. मला 1980-90 च्या दशकातील काळ आठवतोय. जो माझा कारसेवक गेला, त्यांना गोळ्या मारुन ठार केलं. या लोकांचा उन्माद सुरू केला होता. सगळ्या गोष्टींचा शेवट बाबरी मशिदीचा ढाचा पडणे. बाबरीचा ढाचा पडल्यानंतर कधीही वाटलं नव्हतं की राम मंदिर उभारलं जाईल. तुम्हाला निश्चित सांगतो, राम मंदिर फक्त नरेंद्र मोदींमुळेच या देशात होऊ शकलं. 


तुम्हाला-आम्हाला जातीपातीमध्ये गुंतवून ठेवतात


शहरांकडे व्यवस्थित लक्ष दिलं जाऊ नये म्हणून इकडंचे अनेक नेते तुम्हाला-आम्हाला जातीपातीमध्ये गुंतवून ठेवतात. मी अनेकदा विनंती केली आहे की, जातीपातीतून बाहेर या. आपल्या आयुष्याचा विचार करा. एखादा माणूस असतो, स्वत:ची कमजोरी लपवण्यासाठी जातीपातीचा आधार घेतो. 


अजित पवार या माणसाने जातीपातीचे राजकारण केले नाही


1999 साली जेव्हा शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक इथं आहेत, पण अजितदादांबरोबर आहेत. माझे अजित पवारांबरोबर अनेक मतभेद असतील. पण अजित पवार या माणसाने जातीपातीचे राजकारण केले नाही. आजपर्यंत मी त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण शरद पवारांसोबत राहून देखील त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही. इथ गडकरींचा पुतळा उखाडला गेला. अनेकांना वाटलं गडकरींचे नातेवाईक आहेत. या सगळ्या गोष्टी विष कालवण्यासाठी केल्या गेल्या. 


तर राज ठाकरे आज फतवा काढतो


मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये आणि मशीदीमध्ये फतवे निघत आहेत की, काँग्रेसच्या उमेदवारांना मत द्यावीत. निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढत आहात. पण त्यांना मुस्लीमांना चांगलं समजतं कोण कोणाला वापरुन घेतय. फतवे काढून सांगतात, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. मशिदीतून हे फतवे काढत असतील तर राज ठाकरे आज फतवा काढतो की, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो -भगिनींनो आणि मातांनो भाजप, शिदेंचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी विजयी करा.