Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यामुळे फक्त पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्तेच उपस्थित होते. या बंद दरवाजामागील मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, "20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग तुम्ही एकमेकांशी का भांडता?" असा सवाल करत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या तयारीला तात्काळ लागण्याचे स्पष्ट आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं की, "विनाकारण कोणाला मारू नका, आधी समजवून सांगा. जर समोरचा व्यक्ती मराठी शिकायला आणि बोलायला तयार असेल, तर त्याला शिकवा. उर्मटपणाने वागणाऱ्यांशी वाद घालू नका. मात्र, जर कोणी उर्मटपणे बोलले, तर मग त्यानुसारच पुढची भूमिका घ्या, व्हिडिओ काढू नका" असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला आहे.
मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार
तर राज ठाकरे यांनी मेळाव्यातील भाषणामध्ये म्हटले आहे की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा, मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा. मतदार याद्यांवर काम करा. मी आणि उद्धव ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र येऊ शकतो तर मग तुमच्यात हेवेदावे ठेवू नका आणि एकत्रित येऊन कामाला लागा. युती संदर्भात काय करायचं? त्याचा निर्णय मी घेईल. तुम्ही फक्त कामाला लागा. यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार हे टाळ्यांसाठी मी बोलत नाहीये. जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या. जे पक्षापासून दूर गेलेले आहेत त्यांना सुद्धा एकत्र करून तयारीला लागा, अशा सूचना देखील राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत.
बाळ नांदगावकरांची प्रतिक्रिया
दरम्यान, मनसेचा मेळावा पार पडल्यानंतर मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत पूर्वीच पोहोचल्या आहेत. जर आम्ही दोघे भाऊ 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर येऊ शकतो, तर तुमच्यात वाद ठेवू नका एकोप्यानं काम करा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती बाला नांदगावकर यांनी दिली आहे.
आणखी वाचा