Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. मुंबईचा महापौर मराठी होणार आणि आमचाच होणार, असंही राज ठाकरे म्हणाले. तर महाराष्ट्राच्या रक्षणसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितले. आज (24 डिसेंबर) मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली. (Shivsena UBT MNS Yuti) 

Continues below advertisement

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी रावसाहेब दानवेंच्या विधानावरुन प्रश्न विचारला. ठाकरेंची ही निवडणूक शेवटची आहे, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत. कार्यकर्ते आपलं आपलं भविष्य स्वीकारतील, असं विधान भाजपाचे नेते रावसाहेब दानवेंनी केलं होतं. यावर राज ठाकरेंनी एका वाक्यात प्रत्युत्तर देत निशाणा साधला. 

ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं? (Raj Thackeray And Uddhav Thackeray)

राज ठाकरेंनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केल्यानंतर पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये ठाकरेंची ही निवडणूक शेवटची आहे, असं भाजपाचे नेते रावसाहेब दानवे म्हणाले होते. रावसाहेब दानवेंच्या या विधानावरुन पत्रकाराने उद्धव ठाकरेंना विचारले. यावर त्यांना उत्तर द्यायला, ते त्या पातळीचे नाहीय. त्यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. यानंतर बाजूला बसलेल्या राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक घेतला आणि मला वाटतं उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाहीत, असं म्हणाले. राज ठाकरेंच्या या विधानानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. 

Continues below advertisement

उद्धव ठाकरे काय म्हणाले? (Raj-Uddhav Thackeray Yuti)

मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उधावर्ती लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली. इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे पाहायला मिळताय, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी त्याच्या वाट्याला आलं तर त्याला सोडत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरे काय म्हणाले? (Shivsena UBT-MNS Yuti)

राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. आज शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार , हे आता सांगणार नाही, असंही राज ठाकरेंनी सांगितले. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा विश्वासहा राज ठाकरेंनी व्यक्त केला. 

संबंधित बातमी:

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!