नवी दिल्ली: सध्या देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही दिवाळी साजरी करण्यात मग्न आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी यंदाची दिवाळी (Diwali 2024) ही दिल्लीतील कष्टकऱ्यांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या घराला रंग द्यायला आलेल्या कामगारांसोबत काम केले.
यावेळी राहुल गांधी यांनी अगदी भिंत खरवडण्यापासून ते रंग मारण्यापर्यंत सर्व काम केली. भिंत खरवडताना किंवा भेगांमध्ये लांबी भरताना काय समस्या येतात, याबद्दल कामगारांशी गप्पा मारल्या. तुम्हाला या सगळ्या कामाचा काय त्रास होतो, याबद्दल राहुल गांधी यांनी त्यांना प्रश्न विचारले. यावेळी राहुल गांधी यांचा भाचा रेहान वढेरा हादेखील त्यांच्यासोबत होता. राहुल गांधी यांनी रेहानलाही त्यांच्यासोबत कामाला लावले.
यानंतर राहुल गांधी दिल्लीतील उत्तम नगरमध्ये मातीच्या पणत्या आणि नक्षीकाम केलेली भांडी तयार करणाऱ्या एका कारखान्याला भेट दिली. याठिकाणीही राहुल गांधी यांनी पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी आणि पणत्या तयार कशा केल्या जातात, याची माहिती घेतली. राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष या कामाचा अनुभवही घेतला. राहुल गांधी हे अलीकडच्या काळात सातत्याने कष्टकरी वर्गाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना दिसतात. त्यांच्या या व्हिडीओला लोकांची पसंती मिळताना दिसत आहे.
पंतप्रधान मोदींनी कच्छमध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली
पंतप्रधान मोदी गुरुवारी कच्छमध्ये भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मोदींनी लष्करी गणवेश परिधान केला होता. मोदींचे आर्मी लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी लष्करी जवानांना मिठाई भरवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा